नवी दिल्ली- आपण कधीच कट्टर उजव्या विचारसरणीच्या राष्ट्रवादी नेत्यांच्या दृष्टिकोनातील भारतीय बनू शकत नाही. तसेच भारताचा भाग असलेल्या जम्मू काश्मीरला कोणतेच भवितव्य नाही, अशी विचारसरणी असलेला काश्मिरीही आपण होऊ शकत नाही, असे वक्तव्य नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केले आहे. उमर यांनी इंडिया टूमारो: कॉन्व्हर्सेशन विथ द नेक्स्ट जनरेशन ऑफ पॉलिटीकल लीडर्स या आपल्या पुस्तकात त्यांनी ही भूमिका मांडली आहे. अशा स्थितीत इतरांच्या मताप्रमाणे न वागता आपण आहोत तसेच राहणे अधिक योग्य असेच आपल्याला वाटते, असेही उमर यांनी म्हटले आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरबाबत जे काही केले ते त्यांनी परत घ्यावे असे, आपण त्यांना सांगणार नाही. तसेच केंद्राने आम्हाला या विषयावर चर्चा करण्याच्या लायकीचेही ठेवले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले असून पुस्तकाच्या लेखकांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली. उमर म्हणाले, जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. मला झालेली नजरकैद आणि पाच ऑगस्टच्या त्या निर्णयानंतर राज्यात बदललेली परिस्थिती यानंतरही माझ्या या भूमिकेत बदल झालेला नाही. काश्मीर भारतातच आहे. माझा हा विचार सर्व अंगांनी विचार केल्यावरच तयार झाला आहे. भारतापासून वेगळे झाल्यानंतर जम्मू काश्मीरला काही भवितव्य असेल असे आपल्याला मुळीच वाटत नाही. 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरबाबत जो निर्णय घेतला तो कोणत्याही बाजूने योग्य नव्हता. राज्याला दिलेला प्रत्येक शब्द मोडण्यात आला आणि राज्याला अत्यंत वाईट वागणूक देण्यात आली, असे त्यांनी नमूद केले.