पुणे जिल्हा : सत्यता पडताळून न पाहता आरोप करणे चुकीचे

महायुतीच्या कार्यकर्त्यांची न्हावरे येथे पत्रकार परिषद : घटनेचा केला निषेध
न्हावरे –आमदार अशोक पवार यांचे यांचे पुत्र घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज पवार यांच्यासोबत घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे. याचा आम्ही निषेधच करतो. अशी घटना कोणाबरोबरही होऊ नये. घडलेल्या प्रकारात पोलीस तपास करून सत्य समोर येईल; परंतु आमदार अशोक पवार यांनी या घटनेला निवडणुकीच्या प्रचारादरम्यान यात वाघोली कनेक्शनचा संशय व्यक्त केला. सत्यता पडताळून न पाहता घाईघाईने विरोधकांवर आरोप करत आहेत, हे चुकीचे आहे, असे मत शिरूर बाजार समितीचे माजी अध्यक्ष शशिकांत दसगुडे यांनी व्यक्त केले.
न्हावरे (ता. शिरूर) येथे महायुतीचे शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या घटनेला राजकीय वळण लागले असून आरोप, प्रत्यारोप होऊ लागले आहेत. त्यासंदर्भात ही पत्रकार परिषद घेण्यात आली.
शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष रवी काळे म्हणाले, या घटनेकडे राजकीय दृष्टीने न पाहता अशोक पवार यांनी भावनिक होऊन पाहावे. ऋषीराज पवार हे वयाने लहान असून त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगाने सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेचा पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो. ही घटना दुपारी2 ते 3 च्या दरम्यान घडलेली असताना तुम्ही सभा घेत राहिला. आमदार अशोक पवार यांची सभा लोणीकाळभोरमध्ये सुरू असताना त्यांना घटनेची माहिती मिळाली.
पोलिसांनी आरोपींना अटक करून तपास सुरू केला. हे सर्व होत असताना पवार यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर संशय व्यक्त केला. यात वाघोली कनेक्शन असल्याचे सांगितले. तुम्हाला विरोधकांवर आरोप करण्याची घाई का झाली ? तुमचा गृहखात्यावर विश्वास नाही आणि एकीकडे म्हणता शिरूर पोलिसांची कामगिरी चांगली आहे. हे दुटप्पी वक्तव्य नाही का. तुम्ही सांगता आरोपी चार ते पाच दिवस झाले आमच्या बरोबर प्रचारात आहे; परंतु खरी वस्तुस्थिती अशी आहे की लोकसभा निवडणुकीत तो तुमच्याबरोबर प्रचारात होता.
शिवाय वार्ड क्र. 1 मध्ये तुमच्या पक्षाचा बुथप्रमुख होता. तरीही सांगता तो आत्ताच आमच्याकडे आला आहे. कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा, प्रचारात तुमच्याबरोबर मग घटनेचा रोष विरोधकांकडे का? आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून तपास चालू आहे. तुमचा शिरूर पोलिसांवर विश्वास आहे मग सत्य बाहेर येईलच. असे असताना घाईघाईने वाघोली कनेक्शन म्हणत विरोधकांवर संशयाची सुई का करीत आहात. यावेळी सुधीर फराटे, श्रीनिवास घाडगे यांनीही आपले मनोगते मांडली.





