Ajit Pawar : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र लढत असल्याने, पुढील काळात दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत चर्चांना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मागचं झालं गेलं गंगेला मिळालं, आता आपण एकोप्याने काम करायचं आहे. साहेबांचं नेतृत्व म्हणजे पुढची दृष्टी असणारं नेतृत्व आहे, असे अजित पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीतील दुरावा संपवण्याचे आणि दोन्ही गट जवळ येण्याचे संकेत मिळत असल्याचे मानले जात आहे. नेमकं काय म्हणाले अजित पवार? आम्ही यावेळी तुतारी आणि घड्याळाला बरोबर घेतलं आहे. आम्हाला वाद घालायचा नाही. मागचं झालं गेलं गंगेला मिळालं, आता एकोप्याने काम करायचं आहे. साहेबांचं नेतृत्व म्हणजे दूरदृष्टीचं नेतृत्व आहे, असे अजित पवार म्हणाले. केंद्राचं आणि राज्याचं राजकारण महापालिकेत आणायचं नाही, तिथलं राजकारण तिथंच ठेवायचं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचारावर घणाघात पिंपरी-चिंचवड शहरातील भ्रष्टाचाराचा आका कोण आहे, असा सवाल उपस्थित करत तो आका संपवायचा आहे, असा एल्गार अजित पवार यांनी केला. पिंपरी-चिंचवड शहरातील भ्रष्टाचाराला आळा घालायचा असून, त्या आकाला त्याची जागा दाखवायची आहे, असे ते म्हणाले. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. 25 वर्षांची कारकीर्द समोर ठेवा आमची 25 वर्षांची कारकीर्द पाहा आणि यांची गेल्या 8 ते 9 वर्षांची कारकीर्द पाहा, असे आवाहन अजित पवार यांनी केले. आमच्याकडे सत्ता असताना कधी सत्तेचा माज येऊ दिला नाही, सत्तेची मस्ती केली नाही. अनेक समाजघटकांना प्रतिनिधित्वाची संधी दिली. पिंपरी-चिंचवड शहराला देशातील पहिल्या क्रमांकावर नेण्याचा आमचा संकल्प आहे. त्यासाठी माझ्या विचारांची माणसं निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीच्या राजकारणात मोठे बदल घडणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.