पवार-ठाकरेंच्या भेटीत काय झालं? संजय राऊत म्हणतात,”या बैठकीमध्ये…”

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील ठाकरे गट,काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात असलेली विसंगती संपूर्ण राज्याला मोठ्या प्रमाणात जाणवत होती. याच अनुषंगाने काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर दोन्हही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यानंतर आज ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ठाकरे पवार यांच्यात झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात बिनसलं असल्याच्या चर्चा गेल्या दोन – तीन दिवसांपासून सुरु होत्या. शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी यांची केलेली पाठराखण, मोदींच्या पदवीवरून सुरु असलेल्या वादावर मांडलेली भूमिका तसेच अजित पवार यांनी शिवसेनेकडून एव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत असताना ईव्हीएमला दिलेली क्लीनचिट यांमुळे उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात दुरावा वाढत चालल्याच्या बातम्या समोर येत होत्या. अशात दोन्हही नेत्यांमध्ये झालेली भेट चर्चेचा विषय होती. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याचा खुलासा संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना या भेटीबाबत वायव्य केलं आहे. शरद पवार यांच्यासोबत उद्धव ठाकरेंची काल प्रदीर्घ बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यासह देशातील महत्वाच्या राजकीय घडामोडींवर आणि भविष्याची दिशा ठरवण्याबाबत चर्चा झाली. ही चर्चा अतिशय सकारात्मक झाली असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
अनेक विषय यावेळी चर्चेमध्ये होते. शरद पवार हे या देशाचे जेष्ठ नेते आहेत. या चर्चेमध्ये पवार ठाकरेँव्यतिरिक्त सुप्रिया सुळे तसेच मी स्वतः उपस्थित होतो असंही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. तसेच बाबरीबाबत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर तुम्ही दिल्लीला काय कळवता इथे ऍक्शन घ्या असं खडे बोल देखील राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले.





