नेमके काय ठरलंय..! ‘तर अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील’; भाजप नेत्याचं विधान चर्चेत…

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात सत्तासंघर्षाचा दुसरा अंक सर्वांना पाहायला मिळाला. बंडखोरीनंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ‘घड्याळ’ या पक्षचिन्हावर दावा केला आहे. याबाबतचे पत्रही निवडणूक आयोगाला दिले आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले असून, त्यामुळे राज्यातील राजकारण पूर्णपणे बदलत चालल्याचे चित्र दिसून येत येत आहे.
वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत आपल्या 40 आमदारांसह भाजपची साथ धरली. आता आठ, दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार बाहेर पडले अन् त्यांच्या गटातील नऊ आमदारांसह सत्तेत आले. आता भाजपसोबत येताना अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले होते का? यासंदर्भात भाजप नेत्याने मोठा दावा केला आहे. सध्या त्यांचे हे व्यक्तव चांगलेच चर्चेत आले आहे.
भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत हे विधान केले आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. संजय काकडे म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला असेल तर अजित पवार मुख्यमंत्री होतील. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर काय ठरलंय ते पाहावं लागणार आहे. परंतु भाजपसोबत आल्याचा अजित पवार यांना नक्की फायदा होणार’ असल्याचं देखील ते यावेळी म्हणाले.





