Shamita Shetty: ‘लग्न करून नेमकं काय मिळवलं?’; ट्रोलर्सना शमिता शेट्टीचं सडेतोड उत्तर
Shamita Shetty शमिताने पुढे ट्रोलर्सना सुनावत म्हटलं की, “सिंगल महिलांना वयावरून कमी लेखणं, त्यांना टोमणे मारणं आणि जुनाट विचारसरणी लादणं थांबवा. जर माझं आयुष्य तुम्हाला इतकं खटकत असेल, तर मला फॉलो करणंच बंद करा.”

Shamita Shetty: ‘मोहब्बतें’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री शमिता शेट्टी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. वाढत्या वयावरून आणि लग्न न केल्यामुळे ट्रोल करणाऱ्यांना तिने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तिच्या स्पष्ट आणि ठाम भूमिकेचं अनेकांकडून कौतुक होत आहे.
शमिताने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एका यूजरची कमेंट शेअर केली. त्या व्यक्तीने तिच्या वयावर टीका करत, “तुझं वय झालं आहे, आधीसारखी राहिली नाहीस,” असा टोला लगावला होता. यावर शमिताने अतिशय शांत पण ठाम शब्दांत उत्तर दिलं. ती म्हणाली, “हो, मी बदलले आहे. वेळेनुसार प्रत्येक गोष्ट बदलते. हेच आयुष्याचं नैसर्गिक सत्य आहे. बाह्य सौंदर्य कायम राहत नाही. पण मी माझ्या वयानुसार फिट, हेल्दी आणि आनंदी आहे. देवाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी कृतज्ञ आहे.”

Shamita Shetty
याचसोबत काही जणांनी तिच्या सिंगल लाइफवरही प्रश्न उपस्थित केले. “वेळेवर लग्न केलं असतं तर आज मुलं मोठी झाली असती,” अशी कमेंट एका यूजरने केली. त्यावर शमिताने खणखणीत शब्दांत उत्तर देत विचारलं, “तुम्ही लग्न करून नेमकं काय उखाडलं आहे भाई?” तिच्या या उत्तराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
शमिताने पुढे ट्रोलर्सना सुनावत म्हटलं की, “सिंगल महिलांना वयावरून कमी लेखणं, त्यांना टोमणे मारणं आणि जुनाट विचारसरणी लादणं थांबवा. जर माझं आयुष्य तुम्हाला इतकं खटकत असेल, तर मला फॉलो करणंच बंद करा.”
अनेक चाहत्यांनी शमिताच्या या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. महिलांनी लग्न, वय किंवा समाजाच्या ठराविक चौकटीतच जगावं, ही मानसिकता आता बदलायला हवी, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. स्वतःच्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे, हे शमिताने आपल्या उत्तरातून ठामपणे दाखवून दिलं.





