Satara: ‘थापा’ सील करून प्रशासनाने नेमके काय साधले?
Satara: थापा सील झाल्याने दसरा उत्सव कसा पार पडणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर वाईच्या प्रांताधिकार्यांनी महाबळेश्वरच्या तहसीलदारांना थापा खुला करण्याबाबत निर्देश दिल्यानंतर उत्सवाचा मार्ग मोकळा झाला.

Satara: पसरणी येथील ऐतिहासिक दसरा उत्सव यंदा हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. मात्र, उत्सवापूर्वी प्रशासनाने थापा सील केल्याने निर्माण झालेल्या वादाचे पडसाद अद्याप कायम आहेत. संभाव्य वादाचे कारण पुढे करून करण्यात आलेल्या या कारवाईचा आधार काय होता, असा सवाल थाप्याचे केअरटेकर गोविंद येवले यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, केदारनाथ आणि भैरवनाथ या देवतांची पारंपरिक बंधुभेट यंदा होऊ न शकल्याने पसरणीकरांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
थापा सील झाल्याने दसरा उत्सव कसा पार पडणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर वाईच्या प्रांताधिकार्यांनी महाबळेश्वरच्या तहसीलदारांना थापा खुला करण्याबाबत निर्देश दिल्यानंतर उत्सवाचा मार्ग मोकळा झाला. थाप्याचे मालक वाकडे यांनीही दांडेघर आणि पसरणी ग्रामस्थांना सहकार्य केले. विशेष म्हणजे, हजारो ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित असतानाही कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सांगत येवले यांनी प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
बंधुभेटीची परंपरा खंडित
दसरा उत्सवातील केदारनाथ आणि भैरवनाथ या देवतांची पारंपरिक बंधुभेट यंदा होऊ शकली नाही. दांडेघर ग्रामस्थांनी पोलीस बंदोबस्तात पालखी लवकर काढून माघारी नेल्याने ही परंपरा खंडित झाली. त्यामुळे पसरणीतील तरुणांमध्ये नाराजी पसरली. काही तरुणांनी रस्त्यावर ठिय्या दिल्यानंतर प्रशासनाला त्यांची समजूत काढावी लागली. पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळल्याने मोठा वाद टळला. उत्सव निर्विघ्न पार पडला असला, तरी बंधुभेट न झाल्याची खंत ग्रामस्थांच्या मनात कायम आहे.
‘तक्रारींच्या आधारे एवढी मोठी कारवाई कशी?’
गोविंद येवले यांनी सांगितले की, भविष्यात वाद होण्याची शक्यता व्यक्त करून थापा सील करण्यात आला. या कारवाईमुळे गेल्या सहा महिन्यांपासून आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. थाप्यावर आजपर्यंत किती मारामारीचे प्रसंग घडले? किती गुन्हे दाखल झाले? प्रशासनाने कोणत्या चौकशीच्या आधारे हा निर्णय घेतला? संभाव्य वादाची शक्यता आणि प्रत्यक्ष घडलेली घटना यांत फरक असतो. हजारो ग्रामस्थ उपस्थित असताना दसर्याच्या दिवशी कोणताही मोठा अनुचित प्रकार घडला नाही. मग थापा सील करण्याची वेळ का आली, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, अशी मागणी येवले यांनी केली.
दांडेघरमधील हॉटेलांना एक न्याय, आम्हाला दुसरा?
दांडेघर परिसरातील काही हॉटेलांच्या जागा वर्ग दोनच्या जमिनीवर असल्याचा आक्षेप येवले यांनी घेतला आहे. संबंधित बांधकामांना कोणत्या परवानग्या देण्यात आल्या, प्रांताधिकार्यांनी अतिक्रमण हटविण्याबाबत केलेल्या कारवाईचे पुढे काय झाले आणि संबंधित प्रकरणांत प्रशासनाने काय कार्यवाही केली, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. दांडेघरमधील हॉटेलांना परवानग्या कशा मिळाल्या? त्यांना एक न्याय आणि आम्हाला दुसरा का? कायदा फक्त आमच्यासाठीच आहे का? असा सवाल येवले यांनी उपस्थित केला.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
थापा सील करण्यामागे नेमकी कोणती कायदेशीर तरतूद आणि वस्तुस्थिती होती? कारवाईपूर्वी संबंधित बाबींची सखोल तपासणी करण्यात आली होती का? दांडेघर परिसरातील कथित बांधकामे आणि परवानग्यांबाबत प्रशासनाची भूमिका काय आहे? या प्रश्नांवर महाबळेश्वरच्या तहसीलदारांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी होत आहे.





