Maharashtra Budget 2025-26 : अर्थसंकल्पात ‘उद्योगनगरीला’ काय मिळालं? ‘या’ होत्या प्रमुख मागण्या

पिंपरी-चिंचवडः राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काल १० मार्च रोजी दुपारी २ वाजता राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये वाढ होईल, अशी आशा बहिणी बाळगून होत्या. मात्र, अर्थसंकल्पात हप्त्याच्या वाढीबाबात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे दरमहा मिळणारा १५०० रुपयांचा हप्ता कायम राहणार आहे.
दुसरीकडे या अर्थसंकल्पात राजधानी मुंबईसाठी भरीव निधीची तरदूत करण्यात आली आहे. पुणे शहरात मेट्रोचा विस्तार आगामी काळात करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, शहरालाच लागून असलेल्या पिंपरीच चिंचवड अर्थात उद्योगनगरीच्या वाट्याला निराशा आल्याचे बोलले जात आहे. या अर्थसंकल्पात पिंपरीचिंचवड शहरासाठी एकही महत्वपूर्ण प्रकल्प, योजनाची घोषणा करण्यात आलेली नाही.
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा एककाळचा बालेकिल्ला मानला जात होता. महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर येथील अनेक विकास कामांना गती मिळाली. या गोष्टीचा उल्लेख अजित पवार आपल्या भाषणात नेहमी करत असतात. लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांनी पुत्र पार्थ पवार यांना मावळ लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी तिकीट दिले. मात्र, पार्थ यांचा मावळमधून पराजय झाला. त्यानंतर अजित पवार यांनी याबाबात आपली नाराजीही उघडपणे बोलून दाखवली होती.
महामालिकेची मागणी
शहरातून वाहणाऱ्या पवना नदीचा सुधार प्रकल्प आराखडा महापालिकेने तयार केला आहे. त्यासाठी १ हजार ४३५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्य आपत्ती निवारण निधी अंतर्गत ५८० कोटीच्या निधींची, पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पासाठी राज्य सरकारने मदत करावी, अशी महापालिकेची मागणी होती. मात्र, याबाबत कोणतीही घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. तसेच मेट्रोची नाशिक फाटामार्गे मोशी चाकण या नव्या मार्गिकेचीही मागणी करण्यात आली होती. मात्र, अर्थसंकल्पात याबाबतही कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.





