शनिवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या प्रश्नावर पाकिस्तानने काय म्हटले? जाणून घ्या…

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानदरम्यान शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता युद्धबंदीचा करार झाला, परंतु अवघ्या काही तासांतच दोन्ही देशांनी एकमेकांवर करारभंगाचे आरोप केले. भारतीय विदेश सचिव विक्रम मिस्री यांनी शनिवारी रात्री पत्रकार परिषदेत पाकिस्तानवर युद्धबंदीच्या कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने भारतावरच उलट आरोप लावत आपली भूमिका स्पष्ट केली.
विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “शनिवारी दुपारी भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी संचालकांदरम्यान (डीजीएमओ) झालेल्या करारानुसार सर्व हल्ले थांबवण्याचे ठरले होते. परंतु, गेल्या तीन तासांपासून पाकिस्तानकडून या कराराचे सातत्याने उल्लंघन होत आहे. भारतीय सशस्त्र दल याला योग्य आणि कठोर प्रत्युत्तर देत आहेत.” मिस्री यांनी पाकिस्तानला या उल्लंघनांना त्वरित आळा घालण्याचे आणि परिस्थिती गांभीर्याने हाताळण्याचे आवाहन केले. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर आणि जम्मूसह अनेक ठिकाणी रात्री स्फोटांचा आवाज ऐकू आला, तर उधमपूरमध्ये हवाई संरक्षण यंत्रणांनी ड्रोन हल्ल्यांना तोंड दिले.
Statement by the Spokesperson
Responding to media queries regarding the statement made by the Foreign Secretary of India regarding ceasefire violations, the Spokesperson said:
“Pakistan remains committed to faithful implementation of ceasefire between Pakistan and India,…
— Ministry of Foreign Affairs – Pakistan (@ForeignOfficePk) May 11, 2025
याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने रविवारी पहाटे सोशल मीडियावर एक निवेदन जारी केले. निवेदनात म्हटले आहे, “पाकिस्तान भारतासोबत झालेल्या युद्धबंदी कराराची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करण्यास कटिबद्ध आहे. काही भागांत भारताकडून कराराचे उल्लंघन होत असले, तरी आमच्या सैन्याने जबाबदारी आणि संयमाने परिस्थिती हाताळली आहे.” पाकिस्तानने पुढे असेही नमूद केले की, “युद्धबंदीच्या अंमलबजावणीत कोणतीही अडचण आल्यास ती योग्य स्तरावरील संवादातून सोडवली पाहिजे. जमिनीवरील सैन्यानेही संयम बाळगावा.”
पाकिस्तानच्या या निवेदनात भारतावर युद्धबंदी भंगाचा आरोप करताना कोणतेही ठोस पुरावे देण्यात आले नाहीत. याउलट, पाकिस्तानने शनिवारी रात्री नियंत्रण रेषेवर (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार आणि ड्रोन हल्ले केल्याचा भारताचा दावा आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्सवर लिहिले, “युद्धबंदी कसली? श्रीनगरमध्ये हवाई संरक्षण यंत्रणा कार्यरत झाल्या.”
आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया –
या घटनेनंतर युद्धबंदी टिकवण्यासाठी अनेक देशांनी आवाहन केले आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी युद्धबंदीला “सकारात्मक पाऊल” म्हटले, तर ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांनी युद्धबंदी टिकली पाहिजे, असे म्हटले. चीननेही दोन्ही देशांनी संयम राखावा, असे आवाहन केले.
दरम्यान, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्याने भारताने पाकिस्तानला जबाबदार ठरवले होते. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत ६-७ मे रोजी पाकिस्तान आणि पीओकेमधील ठिकाणांवर हल्ले केले. पाकिस्ताननेही प्रत्युत्तरात ड्रोन आणि मिसाइल हल्ले केल्याने तणाव वाढला. शनिवारी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केली, ज्याला दोन्ही देशांनी मान्यता दिली. मात्र, युद्धबंदी भंगामुळे परिस्थिती पुन्हा नाजूक बनली आहे. भारत आणि पाकिस्तानचे डीजीएमओ १२ मे रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा चर्चा करणार आहेत. भारताने दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.





