जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचे काय ?

सातारा – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला उद्या दि. 20 रोजी नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. तेव्हाच्या सरकारने जादूटोणाविरोधी कायदा महाराष्ट्रात लागू केला. मात्र, त्यानंतर राज्यात तीन वेळा सरकार बदललं पण कायदा निर्माण झाल्यावर त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीचे नियम झालेले नाहीत, असा प्रश्न समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यांत म्हैसाळ येथील नऊ जणांचे हत्याकांड, सातारा येथील गुप्तधनाच्या लालसेमधून झालेल्या नरबळीचा छडा लागणे, पुणे येथील गुप्तधनाच्यासाठी बळी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना अटक, नागपूर येथील पाच वर्षाच्या बालकाचा भुताने झपाटले आहे म्हणून नातेवाईकानी मारहाण केल्याने झालेला मृत्यू अशा मानवतेला काळिमा फासणाऱ्या अनेक अंधश्रद्धाविषयक घटना घडल्या. जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कायद्यांतर्गत नमूद केलेल्या दक्षता अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेणे हे देखील अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक जिल्हा पातळीवर जादूटोणा विरोधी कायदा प्रभावी अंमलबजावणीसाठी एक नोडल पोलीस अधिकारी नेमणे आवश्यक आहे, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
शासनाच्यावतीने जादूटोणा विरोधी कायदा अंमलबजावणीसाठी पुरेसे प्रयत्न होत नसले तरी महाराष्ट्र अनिससारख्या संघटना आणि सजग नागरिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रात गेल्या नऊ वर्षात एक हजारांपेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामधील काही गुन्ह्यात लोकांचे शोषण करणाऱ्या सर्व धर्मातील बाबा बुवांना शिक्षा झाली आहे, असे जिल्हा कार्याध्यक्ष वंदना माने यांनी नमूद केले आहे.
राज्यात विविध कार्यक्रम
महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यांतून उद्या सकाळी सात वाजता निर्भय मॉर्निंग वॉक काढणे, राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिनानिमित्त शाळा, कॉलेजमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनावर सप्रयोग व्याख्यान देणे, डॉ. नरेंद्र दाभोलकर खून तपासाबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदारांना निवेदन देणे, आपल्या गावातील सार्वजनिक ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्याजवळ टेबल टाकून नवीन अंनिस कार्यकर्ता आणि अंधश्रद्धा निर्मुलन वार्तापत्र सभासद नोंदणी अभियान हे कार्यक्रम घेतले जाणार आहेत.




