Pune: अंगावर नवा कोरा सलवार-कुर्ता, चेहऱ्यावर निरागस हास्य आणि नव्या कपड्यांचा अवर्णनीय आनंद — गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर गोखलेनगर येथील कामायनी संस्थेतील ३०० दिव्यांग मुलांना ‘वेस्टझोन परिवारा’तर्फे सलवार-कुर्त्याचे वाटप करण्यात आले. कामायनी संस्थेच्या मुनोत सभागृहात हा हृदयस्पर्शी कार्यक्रम पार पडला. उपक्रमाचा पुढाकार युवा सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश कोंढाळकर आणि अनिकेत कोंढाळकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. दिव्यांग मुलांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी उपयुक्त कपड्यांची विशेष तयारी करण्यात आली होती. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवतानाच समाजात संवेदनशीलतेचा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ऋषिकेश कोंढाळकर यांनी सांगितले. मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते. यात प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्यवाह व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या माजी नगरसेविका प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या व नगरसेविका प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, यशदाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव नंदकर, स्वीकृत नगरसेवक रवींद्र साळेगावकर, बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध रांजेकर, मुकुल माधव फाउंडेशनचे समन्वयक सचिन कुलकर्णी, कामायनी संस्थेच्या विश्वस्त श्रीलेखा कुलकर्णी, कार्याध्यक्ष डॉ. आशुतोष भूपटकर तसेच नंदा, स्नेहा व धनश्री कोंढाळकर यांचा समावेश होता. मान्यवरांचे मनोगत प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे म्हणाल्या, “या विशेष मुलांमध्ये आल्यावर खूप वेगळा आणि सकारात्मक अनुभव मिळतो. त्यांच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा आपल्यातील माणुसकी जिवंत ठेवतो. शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या मुलांसमवेत संवादाचे उपक्रम सुरू केल्यास त्यांनाही मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळेल.” ऋषिकेश आणि अनिकेत यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले. राजेश बनसोडे यांनी कार्यक्रमाचे कौतुक करताना विद्यार्थ्यांनी सादर केलेला बँड उत्कृष्ट असल्याचे सांगितले. या मुलांमधून भविष्यात मोठी कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वे घडू शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दिव्यांग मुलांची सेवा हीच खरी देवाची सेवा असल्याचे प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी सांगितले. डॉ. आशुतोष भूपटकर यांनी दिव्यांग कल्याणापासून दिव्यांग सक्षमीकरणाकडे वाटचाल करण्याची गरज अधोरेखित केली. दिव्यांग मुलांवर देवाचा विशेष आशीर्वाद असतो आणि त्यांच्यासमवेत नववर्ष साजरे करणे अत्यंत आनंददायी असल्याची भावना रवींद्र साळेगावकर यांनी व्यक्त केली. समाजातील वंचित घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.