West Bengal Exit Poll 2026 : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ च्या रणसंग्रामातील दुसऱ्या आणि अंतिम टप्प्याचे मतदान आज पार पडले असून, संपूर्ण देशाचे लक्ष आता एक्झिट पोलच्या निकालांकडे लागले आहे. यावेळच्या निवडणुकीत मतदारांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला असून, पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी विक्रमी ९२.८९ टक्के मतदानाची नोंद झाली. २०२१ च्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत १०.५ टक्क्यांची मोठी वाढ झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस आपली सत्ता राखणार की भारतीय जनता पक्ष बंगालच्या भूमीत मुसंडी मारणार, याचा प्राथमिक अंदाज आता विविध संस्थांच्या एक्झिट पोलमधून समोर येऊ लागला आहे. पाहा एक्झिट पोलचे आकडे – विविध निवडणूक पाहणी संस्थांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बंगालमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. ‘MATRIZE’ च्या सर्वेक्षणानुसार, भाजपला १४६ ते १६१ जागा मिळण्याचा अंदाज असून तृणमूल काँग्रेसला १२५ ते १४० जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. याउलट ‘Peoples Pulse’ ने तृणमूल काँग्रेसला ११७ ते १८७ अशा मोठ्या फरकाने आघाडी दिली असून भाजपला ९५ ते ११० जागा मिळतील, असे भाकीत वर्तवले आहे. तर ‘Chanakya’ च्या अंदाजानुसार भाजप १५० ते १६० जागांसह बहुमताच्या जवळ पोहोचताना दिसत असून तृणमूलला १३० ते १४० जागा मिळण्याची शक्यता आहे. या सर्व सर्वेक्षणांमध्ये काँग्रेस आणि इतर पक्षांना केवळ १० पेक्षा कमी जागा मिळताना दिसत आहेत. मागील निवडणुकीत काय घडलं? पश्चिम बंगालसह तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमधील निवडणुकीचा रणसंग्राम आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. बंगालमध्ये २०२१ च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने २९४ पैकी २१५ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजवले होते, तर भाजपला ७७ जागांवर रोखले होते. २०११ पासून प्रत्येक निवडणुकीत आपली जागांची संख्या वाढवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्यासमोर यंदा भाजपने तगडे आव्हान उभे केले आहे. वाढलेली मतदानाची टक्केवारी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाणारी ‘अँटी-इन्कम्बन्सी’ आहे की पुन्हा एकदा ‘दीदीं’वर दाखवलेला विश्वास, हे येत्या ४ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. सध्या तरी एक्झिट पोलच्या आकडेवारीने बंगालमध्ये मोठ्या राजकीय बदलाचे संकेत दिले असून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची धडधड वाढली आहे.