ममता बॅनर्जींचे पंतप्रधान मोदींना पत्र, देशातील बलात्काराच्या घटनांवर व्यक्त केली चिंता

कोलकाता – कोलकाता येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आलेल्या प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. ममतांचे मुख्य सल्लागार अलापन बंडोपाध्याय यांनी आज माध्यमांना ही माहिती दिली.
या पत्रात ममता यांनी पंतप्रधान मोदी यांना म्हटले आहे की संपूर्ण देशभरात बलात्काराच्या घटनांमध्ये नियमितपणे होत असलेल्या वाढीकडे मला आपले लक्ष वेधायचे आहे. उपलब्ध माहितीनुसार अशा अनेक प्रकरणांमध्ये बलात्कारानंतर हत्याही झाल्या आहेत. देशात दररोज बलात्काराच्या ९० घटना घडत असून ही भयावह बाब असल्याचे ममतांनी म्हटले आहे.
अशा घटनांमुळे देश आणि समाजाचा आत्मविश्वास डळमळीत होता आणि विवेकाला हादरा बसतो. महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी हे प्रकार समाप्त करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. अशा गंभीर आणि अत्यंत संवेदनशील मुद्द्याचा व्यापक स्वरूपात सामना करण्यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता आहे.
जेणेकरून अशा गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना कठोर शिक्षा दिली जाऊ शकेल. अशा प्रकरणांमध्ये जलद न्याय मिळण्यासाठी फास्ट ट्रॅक विशेष न्यायालयांची स्थापना करण्याबाबतही प्रस्तावित कायद्यात विचार केला गेला पाहिजे. १५ दिवसांत या खटल्यांचे काम पूर्ण झाले पाहिजे.





