हडपसर – शहरातील दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन व जयहरी विठ्ठल असा नामघोष आणि ज्ञानोबा माऊली-तुकाराम असा जयघोष करीत पंढरीची आस ठेऊन निघालेल्या आषाढी पालखी सोहळ्याचे भागवत भक्तांनी हडपसरमध्ये उत्साही वातावरणात स्वागत केले. ठिकठिकाणी रांगोळ्या काढून होणारे स्वागत आणि हरिनामाच्या गजराने अवघे वातावरण भक्तीमय झाले होते. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा तर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा गाडीतळ येथील विसावास्थळी विसावला. सोहळ्याने येथे काही काळ विसावा घेऊन विठुमाऊलीच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. ध्यास एक, आस एक, अट्टहास एक. मैलोन् मैल प्रवास करून पूर्णत्वाचे प्रतीक असणाऱ्या लाडक्या विठूरायाच्या चरणी लीन होण्याकरिता कपाळी केशरी गंध लावून, खांद्यावर भगव्या पताका घेऊन, डोईवर तुळशीवृंदावन घेत मुखाने अखंड ज्ञानोबा-माऊली तुकारामांचा गजर करत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत शिरोमणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज हडपसरमध्ये दाखल झाल्या. दोन्ही संतांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत आमदार चेतन तुपे पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, शिवसेना शहर अध्यक्ष प्रमोद भानगिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी आमदार महादेव बाबर यांनी केले. सहाय्यक महापालिका आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील. पोलीस उपायुक्त आर. राजा, सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष उल्हास तुपे, माजी नगरसेवक मारुतीआबा तुपे, योगेश ससाणे, सुनील बनकर, विजय देशमुख, माजी नगरसेविका उज्वला जंगले, माजी महापौर वैशाली बनकर, पल्लवी सुरसे, डॉ. शंतनू जगदाळे, संदीप बधे, सुभाष जंगले, उर्मिला आरू, विजया कापरे ,पोलीस ठाण्याचे गोपनीय विभाग प्रमुख दिनेश शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. सेाहळ्यांचे मार्ग वेगळे… गाडीतळ येथील मुख्य बसथांब्याच्या प्रांगणात संत ज्ञानेश्वर महाराजांचा तर सोलापूर महामार्गावरील उड्डाणपुलालगत संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ विसाव्यासाठी थांबविण्यात आला होता. पालिका व पोलिस प्रशासनाने केलेल्या नियोजनानुसार पंचक्रोशीतील नागरिकांनी रांगेने पालखीतील पादुकांचे दर्शन घेतले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ४५ मिनिटांच्या विश्रांतीनंतर सकाळी १०.४५ वाजता सासवड रस्त्याने तर, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दोन तासांच्या विश्रांतीनंतर दुपारी सव्वादोन वाजता सोलापूर रस्त्याने भाविकांनी केलेल्या पुंडलिकवरदेच्या जयघोषात मार्गस्थ झाला.