Purandar : सासवडकरांनी अनुभवला महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा जागर
Purandar : छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा गौरव करणाऱ्या पोवाड्यापासून वासुदेवाचे पारंपरिक नृत्य, लावणी, खुमासदार बतावणी, नाथाचा चौघडा, गाडी घुंगराची अशा विविध लोककला आणि लोकगीतांच्या सादरीकरणाने संपूर्ण सभागृह भारावून गेले.

सासवड/जवळार्जून : वसुबारसच्या मंगलमयी पहाटे भूपाळीच्या भक्तिमय स्वरांपासून ते महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलांच्या विविध रंगांपर्यंतचा अविस्मरणीय सांस्कृतिक प्रवास सासवडकरांनी अनुभवला. श्री हनुमान भजनी मंडळ सेवाभावी संस्था, सासवड आणि रोटरी क्लब ऑफ पुरंदर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दिवाळी पहाट’ अंतर्गत ‘महाराष्ट्राची लोकगाणी-संत आणि लोककलावंतांची वाणी’ हा बहारदार कार्यक्रम सासवड येथे रसिकांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाला.
पहाटे साडेपाच ते सकाळी साडेनऊ या वेळेत रंगलेल्या या सांस्कृतिक सोहळ्यात सुप्रसिद्ध लोककलावंत शाहीर रामानंद उगले आणि त्यांच्या सहकलाकारांनी आपल्या दमदार गायनाने, उत्कृष्ट वादनाने, बहारदार नृत्याविष्कारांनी आणि प्रभावी निवेदनाने उपस्थित रसिकांची मने जिंकली.
छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा गौरव करणाऱ्या पोवाड्यापासून वासुदेवाचे पारंपरिक नृत्य, लावणी, खुमासदार बतावणी, नाथाचा चौघडा, गाडी घुंगराची अशा विविध लोककला आणि लोकगीतांच्या सादरीकरणाने संपूर्ण सभागृह भारावून गेले.
महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या लोकपरंपरा, संतविचार आणि लोककलांचा अनोखा संगम या कार्यक्रमातून घडला. शाहीर रामानंद उगले यांनी प्रभावी शैलीतून रसिकांना विचार करण्यासही प्रवृत्त केले. संत सोपानकाका सांप्रदायिक संगीत पुरस्काराने यशवंत भोसले यांचा गौरव करण्यात आला. श्री हनुमान भजनी मंडळ सेवाभावी संस्थेच्या वतीने यंदाचा प्रतिष्ठेचा ‘संत सोपानकाका सांप्रदायिक संगीत पुरस्कार’ यशवंत शंकर भोसले यांना प्रदान करण्यात आला.
रोटरी क्लब ऑफ पुरंदरच्या वतीने गोसेवेचा आदर्शवत उपक्रम राबविण्यात आला. २०० गायींसाठी गोसंवर्धन व आरोग्यदायी किटचे वितरण करण्यात आले. माजी आमदार संजय जगताप यांनी श्री हनुमान भजनी मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ पुरंदर यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. यावेळी आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी सासवडच्या समृद्ध साहित्यिक आणि सांस्कृतिक परंपरेचा गौरव केला.
यावेळी पुरंदर-हवेलीचे माजी आमदार संजय जगताप, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप, आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, नंदकुमार सागर, कुंडलिक मेमाणे, दिलीप निरगुडे, नगरसेवक मयूर चौखंडे उपस्थित होते.
वसुबारसच्या पवित्र पहाटे भक्ती, संस्कृती, लोककला, समाजप्रबोधन आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुरेख संगम घडविणारा हा सोहळा सासवडकरांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री हनुमान भजनी मंडळ सेवाभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, कार्यकारिणी सदस्य तसेच रोटरी क्लब ऑफ पुरंदरचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. सलग पाच वर्षे दिवाळी पहाटसारख्या सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे.
याप्रसंगी श्री हनुमान भजनी मंडळ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य संदीप टिळेकर यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. संतपरंपरेचा वारसा जपणे, भजनसेवेतून भक्ती आणि संस्कारांची जोपासना करणे, नव्या पिढीला भारतीय संस्कृतीची ओळख करून देणे आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजासाठी योगदान देणे हा संस्थेच्या कार्याचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.





