Anirudh Ravichander And Kavya Maran : थाटात पार पडला विवाह, सोशल मीडियावर फोटो व्हायरल; काव्या आणि अनिरुद्ध यांच्या कुटुंबात कोण कोण?
Anirudh Ravichander And Kavya Maran : या शाही सोहळ्याला रजनीकांत यांच्यासोबत तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.

Anirudh Ravichander And Kavya Maran : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक-संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादची सहमालकीण काव्या मारन यांचा मोठ्या थाटात शाही विवाह सोहळा ग्रीसमध्ये संपन्न झाला. या विवाह सोहळ्याची सध्या मनोरंजन विश्वात जोरदार चर्चा असून, मनोरंजन, राजकारण आणि उद्योगविश्वातील अनेक दिग्गजांनी विवाहसोहळ्याला हजेरी लावली होती.
११ नोव्हेंबर २०२६ रोजी ग्रीसमध्ये अनिरुद्ध आणि काव्या यांनी आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली आहे. या लग्नातील खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. याशिवाय काव्या आणि अनिरुद्ध यांच्या परिवारात नेमकं कोण कोण आहेत हे जाणून घेण्यात चाहत्यांना विशेष रुची आहे.
या शाही सोहळ्याला रजनीकांत यांच्यासोबत तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. अनिरुद्ध हा रजनीकांत यांचा पुतण्या असल्याने या विवाहसोहळ्याला त्यांच्या कुटुंबासाठी विशेष महत्त्व होते. रजनीकांत यांच्या पत्नी लता या अनिरुद्धच्या आईच्या बहिणी आहेत.
कोण आहे काव्या मारन?
काव्या मारन या सन ग्रुपचे अध्यक्ष कलानिधी मारन यांच्या कन्या आहेत. त्या सनरायझर्स हैदराबाद या आयपीएल संघाच्या सीईओ आणि सहमालकीण आहेत. आयपीएलच्या सामन्यांदरम्यान त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात आणि त्या सतत चर्चेत असतात.
अनिरुद्धचं रजनीकांत यांच्या कुटुंबाशी खास नातं!
अनिरुद्धचे वडील रवी राघवेंद्र हे तमिळ चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. आपल्या अभिनयामुळे त्यांनी मनोरंजनविश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर अनिरुद्धची आई लक्ष्मी रविचंदर या शास्त्रीय नृत्यांगना आहेत. अनिरुद्धला वैष्णवी नावाची बहीणही आहे.
विशेष म्हणजे, रजनीकांत यांच्या मुली ऐश्वर्या रजनीकांत आणि सौंदर्या रजनीकांत या अनिरुद्धच्या चुलत बहिणी आहेत. त्यामुळे रजनीकांत आणि अनिरुद्ध यांच्यात कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते आहे. काव्या आणि अनिरुद्ध यांचे नाते रजनीकांत यांनीच जुळवून दिल्याचीही चर्चा आहे.





