Weather Update : राज्यात मुसळधार! पावसामुळे आतापर्यंत ८ जणांचा बळी

Weather Update – राज्यात मुसळधार पावसाचा कहर सुरू असून बुधवारी मराठवाड्यातील २५ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. नांदेड जिल्ह्यात मायलेकींसह पुतणी असे तीन तर अहिल्यानगरात पावसामुळे भिंत कोसळून २ महिला ठार झाल्या तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात वीज पडून ३ बळी गेले आहेत.
नांदेड जिल्ह्यात शेतातून घरी येताना नाल्याच्या पुरात मायलेकी आणि पुतणी अशा तिघी जणी वाहून गेल्याची घटना वरवट (ता. हदगाव) येथे मंगळवारी दुपारी घडली. या घटनेत तिघींचा मृत्यू झाला. अरुणाबाई बळवंत शकर्गे (३७), दुर्गा बळवंत शकर्गे (१०) या मायलेकींसह पुतणी समीक्षा विजय शकर्गे (८) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
लातूरला मंगळवारी विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसाने मुख्य रस्त्यांवर पाणी साचले. गूळ मार्केट ते कव्हा रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर १० दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यावासायिकांना मोठी करत करावी लागली. रस्त्यांवर दुपारी साचलेले पाणी सायंकाळपर्यंत कायम असल्याने गुडघाभर पाण्यातून वाहनधारकांना वाट काढावी लागली.





