Weather Update : मुंबईसह ठाण्यात तुफान पाऊस; अंधेरी सबवे पाण्याखाली, लोकलही विलंबाने

मुंबई – मुंबईसह लगतच्या शहरांत रविवारीपासून पावसाची कोसळधार सुरु होती. मंगळवारी एका दिवसाच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि ठाण्यामध्ये पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई शहरासह उपनगरात तसेच ठाणे, नवी मुंबईत पाऊस सुरु आहे. मंगळवारच्या ब्रेकनंतर पाऊस बरसत असल्याने चाकरमान्यांची तारांबळ उडाली आहे.
मुंबईतील दादर परिसरात जोरदार वाऱ्यामुळे वारा व त्यात असलेल्या पावसामुळे रहिवाशांना पुन्हा अडचणीचा सामना करावा लागत आहे. पावसाची संततधार सुरु राहिल्याने त्याचा फटका लोकलच्या वेळापत्रकाला बसला आहे. मध्य रेल्वेवरील वाहतूक विलंबाने सुरु आहे. रेल्वे २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वे १० मिनिटे उशिराने धावत आहेत.
ठाण्यातही पावसाचे ढग दाटले असून जोरदार पाऊस सुरु आहे. ठाण्यातील वंदना बस डेपो परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. संभावित धोका टाळण्यासाठी पालिकेच्या वतीने सखल भागात पाणी साचू नये म्हणून सक्शन पंप लावण्यात आले आहेत. मात्र साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात दुपारनंतर पाऊस सुरू झाला. जोरदार पावसामुळे परिणामी अंधेरी सबवे नेहमीप्रमाणेच पाणी साचले आहे. अंधेरी सबवेमध्ये दोन ते तीन फूट पाणी भरल्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अंधेरीसह कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर, गोरेगाव या विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु आहे. पण कोठेही पाणी साचलेले नाही.
कोल्हापूरात यंत्रणा अलर्टवर
कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने मुसळधार पाऊस पडत असल्याने पंचगंगेसह इतर नद्यांच्या पाणी पातळीत वाढ आहे. त्यात पावसामुळे, जिल्ह्यात पिकाचे मोठे नुकसान झाली असून अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. त्यामुळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने अलर्ट मोडवर येत वॉर रूम सुरू केली आहे. त्यामाध्यमातून महाराष्ट्र कर्नाटक राज्यांमध्ये समन्वय साधला जात आहे.





