weather update : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ; काही जिल्ह्यांनाही रेड अलर्ट !

weather update – मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासांमध्ये मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या पावसाची तीव्रता 4 सप्टेंबरपासून कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे. तसेच गोदावरी नदीच्या काठावरील शंभर गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून जायकवाडी धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाऊ शकते.
लातूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे छोट्या मोठ्या नद्यांना पूर आला आहे. लातूरसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केले आहे. या मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
यासह, नांदेड जिल्ह्याला देखील हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केले आहे. येथील गोदावरी नदी व इतर नद्या दुथडी भरून वाहत आहेत. या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आले आहे. मूग, सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
बीड जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परळी शहरासह 15 गावांना पाणीपुरवठा करणारे नागापूर धरण ओसंडून वाहत आहे. धरणातील पाणी वाण नदीपात्रात सोडल्याने नदीही ओसंडून वाहत आहे. याच सोबत परभणी जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम असल्याचे दिसत आहे. यामुळे सखल भागात असलेल्या नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरत आहे.
हिंगोलीत कहर, अनेक जण अडकले
काल रात्रीपासून हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असून सावरखेडा येथे चार, औंढा येथे तीन तसेच हिंगोलीत तीन नागरिक अडकले आहेत. जिल्हास्तरावरील पथकाने शोध घेतला असता तरी पूर परिस्थिती पाहता जिल्हा करता बचाव पथकासह हेलिकॉप्टरची आवश्यकता आहे.





