Weather Updates : पुणे जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट, पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट

पुणे – पुणे जिल्ह्यासाठी आज ((26 ऑगस्ट) रेड अलर्ट व उद्या (27 ऑगस्ट आणि 28 ऑगस्ट) रोजी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
राज्यात अनेक भागात पावसाचा इशारा –
दरम्यान, हवामान विभागाने सोमवारी (26 ऑगस्ट) राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. उद्या (27) कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई आणि पालघरसाठी यलो अलर्ट-
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मुंबई आणि पालघरमध्येही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रात देखील अतिमुसळधार पावसाचा अंदाज –
उत्तर महाराष्ट्रात देखील सोमवारी काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाशिकमध्ये तुरळक भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नंदुरबारमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे, सातारा आणि कोल्हापुरातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.






