पुणे शहरातील विधानसभेच्या आठही जागा जिंकू; शिवसेना शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी व्यक्त केला विश्वास

हडपसर : विरोधी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांबद्दल जनतेत कुठलीही सहानुभूती नसून पुणे शहरातील आठही जागांवर भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना महायुतीच विजयी होईल, असा विश्वास शिवसेना शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी व्यक्त केला.
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तर,राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीचं सरकार यांचे उत्तम प्रकारे काम करत आहे. त्यावर नागरिकही खुश आहेत. पुणे शहरातील आठही विधानसभा मतदार संघात महायुती उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने समोर येत असताना मिळणारा प्रतिसाद पाहून हेच लक्षात येत आहे.
मतदार सरकारवर समाधान व्यक्त करत आहेत.असे सांगून अधिक बोलताना शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे म्हणाले की लाडकी बहीण योजनेचा संपूर्ण शहरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत सुमारे दोन लाख महिलांना याचा लाभ मिळाला आहे.अजूनही उर्वरित महिलांना मिळत आहे. संपूर्ण शहरात शिवसेना पूर्णपणे ताकतीने काम करत आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख आणि शिवदूत या माध्यमातून काम सुरू आहे.
शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मतदारांच्या घरोघरी जाऊन महायुती सरकारने केलेली कामे सांगत आहेत. ठिकठिकाणी मतदारांशी संवाद करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहर आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात मला चांगला निधी उपलब्ध करून दिला.
याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आमदार चेतन तुपे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आमदार योगेश टिळेकर यांनीही मतदारसंघात निधी उपलब्ध करून भरीव अशी विकास कामे केली आहेत.त्यामुळे शहरातील आठही जागा महायुती जिंकेल, असा विश्वास आहे.
….विजयात शिवसेनेचा खारीचा वाटा असेल
शहरातील आठही विधानसभेत शिवसेनेचा एकही उमेदवार नसला ,तरी मनात कोणताही किंतुपरंतु न ठेवता शिवसेनेचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता एक दिलाने काम करत आहे .एकनाथ शिंदे साहेब हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता अहोरात्र झटत आहे. शहरातील आठही जागा आम्ही जिंकणार असून प्रत्येक विजयात शिवसेनेचा खारीचा वाटा असणार आहे. – प्रमोदनाना भानगिरे, शहरप्रमुख, शिवसेना पुणे शहर.





