Amit Shah in Kolhapur : महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकू – अमित शहा

कोल्हापूर(प्रतिनिधी) – लोकसभेच्या आगामी निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व म्हणजे 48 जागा जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करू या असा संकल्प भारतीय जनता पक्षाचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.
भाजपाच्यावतीने कोल्हापुर येथे रविवारी अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये विजयी संकल्प मेळावा झाला. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विजयासाठी कंबर कसलेल्या भाजपाने मेळाव्याच्या निमित्ताने आगामी निवडणुकीसाठी रणशिग फुंकले.
शहा पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली समृद्ध भारताचे निर्मिती सुरू आहे. आज भारताने सर्व क्षेत्रात आघाडी घेतली आहे. करोना महामारीच्या कालावधीत देशवासीयांना आरोग्य विषयक सुविधा पुरवल्या. विविध योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट केला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना समृद्ध भारताची निर्मिती हे ध्येय ठेवले. घरोघरी वीज, गॅस कनेक्शन आणि घर तेथे शौचालय निर्माण केले. असे सांगत अमित शहा यांनी मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षाच्या कालावधीत राष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांचे दाखले देत पुन्हा एकदा मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी साऱ्यांनी साथ द्यावी असे आवाहन केले.
पवार, गांधी,ठाकरेंवर निशाणा
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. 2019 मधील निवडणुकीनंतर भाजप सोबत फसगत करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना येत्या निवडणुकीत धडा शिकवा असे आवाहन ही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. 2004 ते 2014 मधील कॉंग्रेस आघाडी ससरकारच्या कालावधीत बारा लाख कोटी रुपयांचा घोटाळा झाला, अशी तोफ शहा यांनी डागली.
श्री अंबाबाईचे दर्शन
शहांनी पत्नी सौ. सोनल यांच्यासह श्री अंबामातेचे दर्शन घेत कुंकूमार्चन पूजा केली. तसेच “आई अंबाबाई, सर्वांना सुख, समृध्दी दे !’ अशी प्रार्थनाही त्यांनी केली. यावेळी मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.
भाजप-शिवसेना एकत्र लढणार
शहा पुढे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार आणि कार्याला सोडचिट्टी देत उद्धव ठाकरे यांनी केवळ सत्तेसाठी शरद पवारांच्या पायाशी लोळण घेतली. 2019 मधील विधानसभा निवडणूक महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. या निवडणुकी भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/people-will-not-beg-sanjay-raut-shahaji-bapu-patil/
भाजपचा मुख्यमंत्री होणे अपेक्षित होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी दोन्ही कॉंग्रेस सोबत हात मिळवणी करून जनमताच अनादर केला. आगामी काळात भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एकत्र निवडणूक लढविणार आहेत.





