Nagar | पोषण आहार कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू- आ. कानडे

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- शालेय पोषण आहार महिला कर्मचारी तटपुंज्या पगारावर काम करतात. पोषण आहार शिजवून तो मुलांना देतात. या महिला कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार लहू कानडे यांनी दिले.
आ. कानडे यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात वर्तमान फाउंडेशन संचलित, कष्टकरी कामगार संघटनेच्या पंतप्रधान शक्तिशाली पोषण आहार स्वयंपाकी कामगारांची बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद लोहोकरे, सचिव डॉ. हरिश्चंद्र राऊत, सारिका बुरकुट, तालुकाध्यक्ष शबाना हकीम आदी व्यासपीठावर होते.
आ. कानडे म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये शालेय पोषण आहार महिला कर्मचाऱ्यांना प्रथम प्राधान्य द्यावे तसेच अटी शर्ती विना त्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, या महिलांना अडीच हजार रुपये प्रति महिना मानधन दिले जाते. मात्र सरकार त्यांच्याकडून मानधनापेक्षा अधिक काम करून घेते. हा या महिलांवर अन्याय आहे. सरकारने त्यांच्या मानधनात वाढ करण्याची आवश्यकता आहे.
लोहकरे म्हणाले की, कमी मानधनामुळे पोषण आहार महिलांना त्यांचे संसार चालविणे मुश्किल झाले आहे. संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी शासन दरबारी निवेदने दिली आहेत. शासनाने आशा, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तक यांच्याप्रमाणे शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना अपघाती मृत्यूसाठी दहा लाख रुपये व अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये, अशी मदत द्यावी.
गाव पातळीवर शालेय समिती पदाधिकारी, शिक्षक व कार्यकर्त्यांकडून त्रास दिला जातो. शासनाने त्यांना समज द्यावी, अशी मागणी करून लोकप्रतिनिधी म्हणून कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी एकनाथ चव्हाण, हकीम शेख, सुनील पठारे, अशोक खरात, श्रावण देवरे, नीलेश लांडगे, सुरेखा चव्हाण, ज्योती पठारे, वर्षा साबळे, गीता शेळके, ज्योती आव्हाड, रेहाना शेख यांच्यासह पोषण आहार महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





