पुणे : पुण्यात सर्वांत मोठी समस्या वाहतूक कोंडीची आहे. बॉटल नेकमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने आगामी कालावधीत शहरात टनेल नेटवर्क डेव्हलप करण्यात येणार आहे. रिंगरोडही तयार करण्यात येतील, तसेच एकूण दोनशे किलोमीटरपर्यंत मेट्रोचा विस्तार केला जाईल आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. गणेश कला क्रीडा मंच येथे महापालिकेच्या वेगवेगळया सुमारे ५० हून अधिक प्रकल्पाचे उद्घाटन, लोकार्पण तसेच भूमीपुजन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, शहरी विकास व इतर खात्यांच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सुनील कांबळे, भीमराव तापकीर, बापूसाहेब पठारे, चेतन तुपे, हेमंत रासने, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, शंकर मांडेकर, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., पवनीत कौर, ओमप्रकाश दिवटे, महामेट्रोचे महाव्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, भाजप शहरध्यक्ष धीरज घाटे, भाजप पुणे शहर निवडणुक प्रमुख गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. पुणे, मुंबई शहरे जगाला माहित आहेत. आयटी, शिक्षण आणि उद्योगांचे हे प्रमुख केंद्र आहे. केवळ कामासाठी नव्हे, तर उत्तम राहणीमानासाठी पुणे कसे आदर्श शहर बनेल, यावर भर दिला जात आहे. वाहतूक कोंडीवर महापालिका आणि राज्य सरकार समन्वयाने काम करत आहेत. रिंगरोड, मिसिंग लिंक, प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण, बॉटलनेक काढणे यामुळे वाहतूक सुलभ होईल, असे फडणवीस यांनी सांगितले. पुणे हे महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन आहे. प्रत्येक राज्याला एकच ग्रोथ इंजिन आहे. महाराष्ट्राला नवी मुंबई आणि पुणे अशी दोन ग्रोथ इंजिन आहेत. पुण्याच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाला असून, शहराला शाश्वत, आधुनिक आणि भविष्यासाठी सज्ज करण्याचा संकल्प सरकारने केल्याचे प्रतिपादनही फडणवीस यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षांत पुण्याचा आमूलाग्र बदल झाला आहे. कागदावरील मेट्रो ३३ किलोमीटर धावत असून पुढील टप्प्यात आणखी २३ किलोमीटरचे काम सुरू होईल. एकूण १०५ किलोमीटर मेट्रोचे जाळे उभे राहील. एक हजार ई-बस रस्त्यावर धावतील. पुणे विमानतळाचा देशात सातवा क्रमांक आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे. प्रास्ताविकात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी विविध विकास कामांचा आढावा मांडला. मोबिलिटी प्लॅन तयार लोकसंख्या वाढीमुळे पाण्याची गरज वाढणार आहे. नव्याने पाणी उपलब्ध होणे मर्यादित असले, तरी शुद्धिकरण, पुनर्वापरावर भर दिला जाईल. एसटीपी प्रकल्पांचे जाळे उभारून पर्यावरणपूरक विकास साधला जाईल. पुण्यासाठी तीस ते पस्तीस हजार कोटींचा मोबिलिटी प्लॅन तयार आहे. पुण्याचा विकास करताना भविष्यातील गरजांचा विचार केला जात असून, एआय, डेटा सेंट्रिक नियोजनावर भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.