‘सांगली लोकसभा मतदारसंघाची दृष्ट काढू’ – नाना पटोले

सांगली – सांगली लोकसभा मतदारसंघाला कोणाची तरी दृष्ट लागली आहे. ती दृष्ट आम्ही उतरवणार असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला न मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांना जितका त्रास झाला, त्यापेक्षा जास्त त्रास मला झाला असल्याचे देखील नाना पटोले यांनी म्हटले आहे.
सांगलीत काँग्रेसच्या वतीने आज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाना पटोले यांनी सांगलीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे. इतकेच नाही तर त्यांनी कार्यकर्त्यांना समजवण्याचा देखील प्रयत्न केला. सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये आपल्याला मशाल पेटवावी लागेल, अशी भावना देखील नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.
पहिला टप्प्यातील सर्व जागा महाविकास आघाडी जिंकणार आहे. तर दुसऱ्या टप्पातील सर्व जागांवर विजयाचा मला विश्वास आहे. आज महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडी सोबत उभी असल्याचा दावाही पटोलेंनी केला आहे. सांगली लोकसभा मतदार संघात आयोजित काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यासाठी ते आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना हा दावा केला आहे.
देशाच्या स्वातंत्र्यात देखील काँग्रेसचा वाटा आहे. तर संविधान बनवण्यात देखील काँग्रेसचाच वाटा आहे. त्यामुळे संविधान वाचवण्याची जबाबदारी देखील ही काँग्रेसचीच आहे. काँग्रेसची भूमिका कायमच देशासाठी राहिली आहे आणि पुढेही राहील.
देशातील नागरिकांनी दोन वेळा सोनिया गांधी यांना पूर्ण बहुमत दिले. त्यांच्याच नेतृत्वात काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाले. तरी देखील त्यांच्यावर सुषमा स्वराज यांनी अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली होती. मात्र आमच्यासाठी देश महत्त्वाचा आहे, असा दावा देखील नाना पटोले यांनी केला आहे.
संघटन म्हणून सर्वजण मविआच्या कामाला लागलो
जागा वाटपामध्ये सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपली जागा आपल्यालाच मिळावी असे वाटते. मात्र एकदा जागा वाटप झाल्यानंतर संघटन म्हणून सर्वजण महाविकास आघाडीसाठी कामाला लागले असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
जागा वाटप पूर्ण झाले असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी आम्ही कामाला लागलो असल्याचेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.





