Narendra Modi – लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिला आरक्षणाची अंमलबजावणी करणारच, या निर्धाराचा पुनरूच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केला. लोकसभेत महिला आरक्षणाच्या मार्गात अडथळा आणल्यावरून त्यांनी पुन्हा विरोधी पक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडले. उत्तरप्रदेशातील वाराणसी या आपल्या लोकसभा मतदारसंघात मोदींनी महिला परिषदेत भाषण केले. त्यावेळी त्यांनी प्रामुख्याने कॉंग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल कॉंग्रेस आणि द्रमुकवर निशाणा साधला. लोकसभेत काही दिवसांपूर्वी महिला आरक्षण अंमलबजावणीसाठीचे घटनादुरूस्ती विधेयक नामंजूर झाले. त्याचा संदर्भ देऊन मोदी म्हणाले, देशहितासाठी महिला आरक्षणाची अंमलबजावणी अत्यावश्यक आहे. ते महत्वाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मला महिला शक्तीच्या आशीर्वादाची गरज आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने संसदेत केलेले प्रयत्न विरोधी पक्षांमुळे अयशस्वी ठरले. मात्र, उद्दिष्ट गाठण्यासाठी मी प्रयत्नांत कुठली कसर ठेवणार नाही. घराणेशाहीवर आधारलेल्या विरोधी पक्षांनी पुन्हा महिलांचा विश्वासघात केला. महिलांनी लोकसभा किंवा विधानसभेत पोहचावे अशी त्यांची इच्छा नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी ४० वर्षांपासून महिला आरक्षणाला ब्रेक लावला आहे. त्यामुळे महिला त्यांच्या अधिकारापासून वंचित राहिल्या आहेत. संसदेत वर्ष २०२३ मध्ये महिला आरक्षण कायदा मंजूर झाला. आता त्याची अंमलबजावणीही गरजेची आहे. त्यासाठीच आम्ही प्रयत्न केले. मात्र, विरोधक महिला शक्तीला घाबरतात. विरोधकांचे मनसुबे देशातील महिलांना योग्य प्रकारे समजले. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले, असे भाष्य त्यांनी केले. त्यातून मोदींनी निवडणूक निकाल जाहीर होण्याआधी विरोधकांना राजकीय इशारा दिल्याचे मानले जात आहे.