Marathwada rain – राज्यात अलिकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसानाला तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक निवेदन दिले आणि मुसळधार पावसामुळे राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. यावेळी पंतप्रधानांनी राज्य सरकारला या संदर्भात एक प्रस्ताव पाठवण्यास सांगितले असून यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्यात गेल्या काही दिवसांपासून गंभीर पूरस्थिती पाहायला मिळत आहे. विशेषता मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. या भेटीबद्दल फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही आमच्या घोषणापत्रात कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही करणार आहोत. ती कधी आणि कशी करायची यासंदर्भात एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ती समिती अभ्यास करत आहे. कारण कर्जमाफी वारंवार करता येत नाही. त्यामुळे ती करत असताना ती अधिक प्रभावी कशी करता येईल, याचा प्रयत्न आहे. आता शेतक-यांना तातडीने त्यांच्या खात्यात मदत जाणे महत्त्वाचे आहे. खात्यातील मदत करणे, हे आमचे प्राधान्य आहे, असे ते म्हणाले. यासंदभात पंतप्रधानांना एक निवेदन दिले आहे. त्यांना एकूण महाराष्ट्रातील पूर परिस्थितीची कल्पना आम्ही दिली. कशा पद्धतीचे नुकसान झाले आहे त्याबद्दल सांगितले. त्यांना विनंती केली की आम्हाला एनडीआरएफच्या माध्यमातून भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करा. त्यांनी देखील सकारात्मकता दाखवली आहे आणि त्यांनी सांगितले की लवकरात लवकर प्रस्ताव येऊ द्या, प्रस्ताव आला की त्यावर कारवाई करू. शक्य तेवढ्या जास्त मदतीचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले आहे, असे फडणवीस म्हणाले.