“समृद्धी महामार्गाला चंद्रपूर जोडण्याचा विचार करू’ – देवेंद्र फडणवीस

चंद्रपूर – आम्ही गडचिरोली या ठिकाणी जात आहोत. परंतु तुमच्या सर्वांचा आग्रह असेल तर समृद्धी महामार्गाला चंद्रपूर जोडण्याचा विचार देखील आम्ही निश्चितपणे करू. कारण मुंबई हे मॅग्नेट आहे. त्याच्याशी जिल्हे जोडायचे आहेत. त्यासोबत जिल्हे जोडले की, औद्योगिकीकरण वेगाने होते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले, मागील काळातील 2014-2019 मध्ये गडचिरोलीसारख्या ठिकाणी 50 वर्षे प्रयत्न चालला होता. तिथल्या खनिज संपत्तीवर आधारित उत्खनन व्हावे. खनिज उद्योग यावा आणि आज आपण तो आणला. उत्खनन सुरू झाले आणि उद्योग तिथे येत आहे.
मी सांगितले की, आमचा वसाहतींसारखा वापर करू नका. जे उत्खनन तुम्ही करता, पहिला स्टील उद्योग गडचिरोलीत झाला पाहिजे. त्यानंतर तो चंद्रपूरला यायला पाहिजे. तसेच तो वर्धेलाही आला पाहिजे. त्यानंतर तो नागपुरला आला पाहिजे, असे ते म्हणाले.
ज्या भागात इतक्या मोठ्या प्रमाणात ही लोहसंपदा मिळतेय. त्या भागातील युवांच्या हाती काम मिळालं पाहिजे. सरकार आल्यानंतर 9 महिन्यांमध्ये जवळपास 40 हजार रुपयांची गुंतवणूक या भागात आणली आहे. त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होताना पाहायला मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.
तुम्हाला शक्ती देण्यासाठी आणि तुमच्या हातून समाजाचं काम झालं पाहिजे, यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठिशी उभे आहोत. जे लोक तुमच्या सोबत आलेले आहेत. त्यांच्या आशा, आकांशा आणि इच्छा पूर्ण करण्याकरिता आम्ही तुम्हाला पाठबळ देऊ. तुमचं भारतीय जनता पक्षात स्वागत करतो, असं फडणवीस म्हणाले.





