पिडीतांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे – ऍड. यशोमती ठाकूर

मुंबई – महिला, बालके तसेच तृतीयपंथीयांच्या मागे ज्याप्रमाणे शासन उभे आहे त्याचप्रमाणे समाजानेही उभे राहिले पाहिजे. अत्याचारग्रस्त बालके आणि महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे. तसेच महिला व बालकांवर अत्याचार करणाऱ्या विकृत मनोवृत्तीला लगाम घालून त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी महिला व बालविकास विभाग नियोजनबद्धरित्या काम करेल, अशी ग्वाही महिला व बाल विकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिली.
बालदिनानिमित्त महिला व बालविकास विभाग आणि युनिसेफच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात कोविड योद्ध्यांच्या सन्मानाचा कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन, आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद, अल्पा वोरा, प्रियदर्शनी हिंगे आदी उपस्थित होते.
ऍड. ठाकूर म्हणाल्या, महिलांच्या कल्याणासाठी खूप काम करणे आवश्यक असून महिला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी येत्या काळात करायची आहेत. बाल लैगिंक शोषण तसेच महिलांवर अत्याचार करणाऱ्या विकृत मनोवृत्तीला लगाम घालायचा असेल तर तो गप्प बसून सहन न करता त्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. अशा घटकांना बोलण्यासाठी प्रवृत्त करणे तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विभागाकडून आगामी काळात नियोजनबद्धरित्या काम केले जाईल, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, ज्युवेनाईल जस्टीस बोर्डसाठी विकसित करण्यात आलेले ज्युवेनाईल जस्टीस इन्फॉर्मेशन सिस्टीम (जेजेआयएस) मोड्यूल विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विधीसंघर्षग्रस्त बालकांना बाल न्याय मंडळासमोर सादर करणे, त्यांना समुपदेशन, पुनर्वसन, आवश्यक मदत आदींच्या अनुषंगाने कार्यवाही, पोलिसांकडे अर्ज पाठविणे, तपास अधिकाऱ्यांनी तपास कार्यवाहीचा तपशील भरणे आदी बाबी या माध्यमातून यापुढे ऑनलाईन होणार आहेत.





