पुणे – मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे येथे व्हावे, या मागणीसाठी पुणे बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. मुंबई विधानभवन येथे भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळामध्ये पुणे बार असोसिएशनचे अॅड. हेमंत झंझाड, उपाध्यक्ष अॅड.समीर भुंडे, सचिव अॅड. पृथ्वीराज थोरात, कार्यकारिणी सदस्य अॅड. आकाश गलांडे आणि अॅड. राकेश ओझा यांचा समावेश आहे. आमदार सत्यजित तांबे यांचे सहकार्याने ही भेट झाली. खंडपीठाच्या मागणीचे पत्र फडणवीस आणि नार्वेकर यांना यावेळी देण्यात आले. दोघांनीही खंडपीठासाठी सकारात्मक दृष्टिकोन दाखविल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली. तसेच आमदार सत्यजितदादा तांबे यांनी विधिमंडळात वकील संरक्षण कायद्यासंर्भात मुद्दा मांडून त्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी संदर्भात मागणी केली. त्यामुळे तांबे यांचा विधानभवन येथे पुणे बार असोसिएशनच्या वतीने सन्मान करण्यात आला.