आगामी निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत

वाठार स्टेशन -जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असून आता या बालेकिल्ल्यात लक्ष घालण्याची गरज आहे. बुथनिहाय सभासद नोंदणी करून जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस बळकट करा, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले. येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत हे डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा असही त्यांनी स्पष्ट केले.
सोळशी (ता. कोरेगाव) येथे बाळासाहेब सोळसकर यांच्या सत्कार समारंभात श्री. पवार बोलत होते. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बूथ वाईज कमिट्या आणि सभासद नोंदणी चालू करावी. याआधीही तरूणांना संधी दिली. याच्यापुढेही देऊ. कार्यकर्त्यांनी, आमदारांनी, नेत्यांनी सर्व तालुके ढवळून काढून येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत हे डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा, असे पवार यांनी सांगितले.
“मी 1999 ला मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. तेव्हापासून सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झंझावात आहे. मी ठरवले असते तर शरद पवार यांना विनंती करून सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री कायम राहिलो असतो,’ असे नमूद करून अजित पवार म्हणाले, पवार कुटुंबीय आणि सोळस्कर यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सोळशी आणि नांदवळची एक शिव आहे. आमचे कुटुंब सोळशीजवळच्या नांदवळचे आहे. आमचे पूर्वज नांदवळचे होते. त्यामुळे नांदवळविषयी आम्हाला कायमच जिव्हाळा राहिला आहे. नांदवळमध्ये आमची पवार भावकी आहे.”
कार्यक्रमाला विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक- निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. दीपक चव्हाण, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील, सारंग पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, बाळासाहेब सोळसस्कर, राजकुमार पाटील, सरपंच आकाश सोळस्कर आदी उपस्थित होते.
संमती असेल तिथेच प्रकल्प होईल
यावेळी अजित पवार यांना भरपूर निवेदने देण्यात आली .यात उत्तर कोरेगावमध्ये प्रस्तावित असणाऱ्या एमआयडीसीविरोधात सुद्धा निवेदन आले होते. त्यावर अजित पवार म्हणाले, “कोणतेही विकास काम होत असताना काही वेळा विरोध होतच असतो. जनतेचा विरोध डावलून महाराष्ट्रात कोणतीही गोष्ट होणार नाही.’ तसेच समृद्धी महामार्ग आणि बारामती एमआयडीसीचे उदाहरण देत पवार म्हणाले, “पहिल्यांदा या प्रकल्पांना विरोध झाला आणि नंतर रेडिरकनरने दर मिळाल्यावर समर्थन मिळाले. त्यामुळे जिथे लोकांची संमती असेल तिथेच प्रकल्प होतील.’





