Chandrashekhar Bawankule : संग्राम थोपटेंच्या रूपाने कोहिनूर हिरा आपल्याला मिळालाय; चंद्रशेखर बावनकुळेंचा आनंद गगनात मावेना

मुंबई : भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. संग्राम थोपटे यांच्याबरोबरच तीन तालुका अध्यक्ष, युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी देखील आज काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील भाजपच्या मुख्यालयात संग्राम थोपटे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
दरम्यान, भाजप पक्षप्रवेशानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, संग्राम थोपटेंच्या रूपाने कोहिनूर हिरा आपल्याला मिळाला आहे अशी प्रतिलारीया दिली आहे. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर हल्लबोल केला आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विदर्भातला एक काँग्रेसचा नेता मागील चार दिवसापासून फोन करत होता आणि विचारना करत होता की, खरच संग्राम थोपटे येताय का? त्यावर आम्ही म्हटलं, हो खरच थोपटे येणार आहेत. काँग्रेस पक्षाचे पतन होण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. काँग्रेस पक्षाला लयाला जाणार हा दिवस आहे, असं ते म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, आम्ही जेव्हा संग्राम थोपटे यांना भेटलो तेव्हा त्यांना विचारलं की तुमचं म्हणणं काय आहे? त्यावेळी त्यांनी सांगितलं मला काही नको, फक्त माझ्या मतदारसंघाचा विकास व्हावा, असं ते म्हणाले. त्यामुळे संग्राम थोपटेंच्या रूपाने कोहिनूर हिरा आपल्याला मिळाला आहे अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांची मला कीव येते : बावनकुळे
दीड कोटीची जाहिरात 150 कोटींची दाखवणं हा बालिशपणा आहे असं सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी हर्षवर्धन सकपाळ यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. हर्षवर्धन सपकाळ माध्यमांत झळकत राहण्यासाठी असा पोरकटपणा करतात, तेव्हा त्यांची कीव येते, असंही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसने आमच्यावर अन्याय केला : संग्राम थोपटे
पुढे बोलताना म्हणाले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्ते मला वारंवार निर्णय घेण्याचे आवाहन करत होते. मात्र, मी निर्णय घेऊ शकत नसल्याचे मी त्यांना सांगत होतो. मी एका पक्षाच्या विचाराशी बांधील होतो. मात्र, अखेर त्याच पक्षाने माझ्यावर ही वेळ आणली असल्याचा आरोप संग्राम थोपटे यांनी केला आहे.
राजकारणात संघर्ष करायला करावाच लागतो, त्यातून आम्ही कधीच डगमगलो नाही. माझ्या वडिलांना देखील कित्येक वर्षे संघर्ष करावा लागला. मी देखील संघर्ष केला. त्यातून सहकार संस्था असो, स्थानिक स्वराज्य संस्था असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, सर्वच ठिकाणी एक हाती सत्ता मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. मात्र, काँग्रेसने आमच्यावर वारंवार अन्याय केला, असं संग्राम थोपटे यांनी म्हटले आहे.





