‘आपली अमेरिका नाही, येथे मराठीतच बोलायचे’; हास्यजत्रा फेम नम्रताच्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल

मुंबई – महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) तिच्या विनोदीशैलीसाठी खास करून ओळखली जाते. प्रेक्षकांचे अविरतपणे मनोरंजन करते. याशिवाय नम्रता सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिच्यासह कुटुंबाचे अनेक व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नुकतेच नम्रता संभेरावच्या चिमूकल्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
इनस्टाग्रामवरील व्हायरल व्हिडिओमध्ये नम्रताचा मुलगा आईला मराठी बोलण्याचा आग्रह करताना दिसत आहे. नम्रता मुलगा रुद्राज आईला अर्थात नम्रताला मराठीत बोलण्यास सांगत आहे. व्हिडिओमध्ये रुद्राज आईला म्हणतो की, “आपली अमेरिका नाही आई, इंडिया आहे. इंडियामध्ये सगळे मराठीच बोलतात आणि तू इंडियामध्ये बोलतेय इंग्लिश. इंडियामध्ये मराठीच बोलायचं इंग्लिश नाही बोलायचे.” यावर नम्रता त्याला म्हणते, “मराठीच बोलू. इंग्लिश नको बोलू.”
हा व्हिडिओ शेअर करत नम्रताने लिहिले की, “माझ्या बाळाची मराठी बद्दलची आत्मियता आणि प्रेम बघून खूप अभिमान वाटला. मराठी माध्यमं लोप पावत चालली आहेत ह्याची खूप खंत वाटते. आमच्या आसपास मराठी माध्यम नाही ही वाईट परिस्थिती आहे.” या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत रुद्राजचे कौतुक केले आहे.
View this post on Instagram
एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले की, ‘इतक्या लहान वयात इतकी समज. अभिमान वाटला खरंच’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, ‘खूप छान संस्कार आहेत.’ दरम्यान, नम्रता संभेराव महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करते. तिच्या या विनोदी अंदाजाचे लाखो चाहते आहेत.





