RR vs MI : ‘आम्ही सुपरस्टार खरेदी करत नाही, तर बनवतो…’, राजस्थान रॉयल्सच्या कोचचं मोठं वक्तव्य

Dishant Yagnik says we make superstars after RR vs MI match : सर्वात पहिल्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावणारा संघ राजस्थान रॉयल्स या हंगामातील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या हंगामात संजू सॅमसन आणि रियान पराग यांच्या नेतृत्वाखालील संघाची कामगिरी खूपच साधारण राहिली. हेच कारण आहे की संघाला त्याच्या घरच्या मैदानावरही जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागला. गुरुवारी मुंबईविरुद्ध झालेल्या पराभवानंतर राजस्थान रॉयल्सचे फिल्डींग कोच दिशांत याज्ञिक यांच मोठं वक्तव्य केले, जे सध्या खूप चर्चत आहे.
राजस्थान रॉयल्सचे फिल्डींग कोच दिशांत याज्ञिक यांच मोठं वक्तव्य –
आयपीएल २०२५ मधील खराब कामगिरीनंतरही, राजस्थान रॉयल्सचे कोच दिशांत याज्ञिक यांनी संघातील तरुण खेळाडूंवर विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले की राजस्थान संघ सुपरस्टार खेळाडू खरेदी करत नाही, तर सुपरस्टार खेळाडू तयार करतो. त्यामुळे मेगा लिलावापूर्वी जोस बटलर आणि ट्रेंट बोल्ट सारख्या सुपरस्टार खेळाडूंना सोडल्याबद्दल टीकेचा सामना करावा लागला तरीही त्यांचा संघ तरुण खेळाडूंना पाठिंबा देत राहील.
आम्ही सुपरस्टार बनवतो – दिशांत याज्ञिक
गेल्या वर्षीचा संघ आणि या वर्षीचा संघातील फरकाबद्दल दिशांत याज्ञिक यांना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, “स्टार्स (खेळाडू) बद्दलच्या तुमच्या प्रश्नात एक मोठा मुद्दा आहे. जेव्हा जेव्हा एखादा नवीन खेळाडू येतो तेव्हा तो स्टार नसतो, पण त्याला स्टार बनवले जाते. गेल्या वर्षी आमच्याकडे जे खेळाडू होते, जेव्हा ते संघात आले तेव्हा ते स्टार नव्हते पण ते स्टार झाले आणि आता आमच्या संघात जे खेळाडू आहेत, त्यांना आम्ही स्टार बनवू. आम्ही सुपरस्टार खरेदी करत नाही, आम्ही सुपरस्टार बनवतो आणि तेच आमचे मुख्य ध्येय आहे.”
हेही वाचा – RR vs MI : रोहितच्या रिव्ह्यूवरुन पेटला नवा वाद! संतप्त चाहत्यांकडून पंचांवर प्रश्न उपस्थित, पाहा VIDEO
आम्ही या संघासोबत पुढे जाऊ आणि जिंकून दाखवू -दिशांत याज्ञिक
दिशांत याज्ञिक पुढे म्हणाले, “वैभव सूर्यवंशीकडे पहा, जेव्हा तो गुजरात टायटन्सविरुद्ध फलंदाजी करत होता, तेव्हा सगळे आनंदी होते. प्रेक्षक आनंदी होते आणि आम्हाला विश्वास आहे की हा खेळाडू येणाऱ्या काळात स्टार बनेल. आता वेळ आली आहे तुमच्याकडे स्टार खेळाडू नाहीत. त्यामुळे तुम्हाला ते विसरून पुढे जावे लागते. आमच्याकडे वैभव, यशस्वी जैस्वाल आहेत. संजू सॅमसन आमचा कर्णधार आहे. आम्ही या संघासोबत पुढे जाऊ आणि जिंकून दाखवू.”





