“आम्ही गुलाम नाही, धमकीला झुकणार नाही”: स्टॅलिन यांचा अमित शाहांवर हल्लाबोल

चेन्नई – तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका करताना केंद्र सरकारच्या धोरणांना आणि तमिळनाडूवरील कथित दबावाला आव्हान दिले आहे. नीट परीक्षा, त्रिभाषा धोरण, वक्फ कायदा दुरुस्ती आणि परिसीमन यांसारख्या मुद्यांना उपस्थित करणे हे ‘लोकांचे लक्ष विचलित करणे’ नसून, राज्यांच्या हक्कांसाठीची लढाई आहे, असे स्टालिन यांनी ठणकावले. त्यांनी शाह यांना थेट आव्हान देताना म्हटले, “जर DMK लोकांचे लक्ष भटकवत असेल, तर या मुद्यांवर शाहांनी तमिळनाडूच्या जनतेला स्पष्ट उत्तरे द्यावी.”
“तमिळनाडू दिल्लीच्या ताब्यात नाही” –
चेन्नईतील एका जाहीर सभेत स्टॅलिन यांनी सांगितले की, तमिळनाडू केवळ स्वतःच्या हक्कांसाठीच नव्हे, तर देशभरातील सर्व राज्यांच्या अधिकारांसाठी लढत आहे. “राज्यांचे हक्क मागणे चुकीचे आहे का? तमिळनाडू दिल्लीच्या नियंत्रणाखाली नाही आणि कोणताही शाह आमच्यावर राज्य करू शकत नाही,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यांनी केंद्र सरकारच्या काही मंत्र्यांनी तमिळ भाषा आणि संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोपही केला. “केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तमिळ भाषेला असभ्य म्हटले नाही का? दुसऱ्या मंत्र्याने तमिळ लोकांना बॉम्बस्फोटांशी जोडण्याचा प्रयत्न केला नाही का? यासाठी तुम्ही माफी मागितली का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“२०२६ मध्ये फक्त द्रविड मॉडेलची सरकार” –
अमित शाह यांनी २०२६ मध्ये तमिळनाडूत भाजप सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता, त्याला प्रत्युत्तर देताना स्टालिन म्हणाले, “छापे, राजकीय तोडफोड आणि धमक्यांचा जो फॉर्म्युला तुम्ही इतर राज्यांत वापरला, तो तमिळनाडूत चालणार नाही. २०२६ मध्ये फक्त द्रविड मॉडेलची सरकारच सत्तेत येईल.” त्यांनी भाजपवर ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीचा अवलंब केल्याचा आरोप केला.
“तमिळांचा अपमान असह्य” –
स्टॅलिन यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी ओडिशातील पुरी मंदिराच्या चाव्या तमिळनाडूत लपवल्याचा आरोप करून तमिळ लोकांवर संशय घेतल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. “हा तमिळांचा घोर अपमान आहे. तुम्ही तुमच्या आघाडीत आत्मसन्मान नसलेल्या आणि विश्वासघात करणाऱ्यांना सामील करता. पण तमिळनाडू ही वीरता, आत्मगौरव आणि सन्मानाने भरलेली भूमी आहे. आम्ही धमकीला झुकणारे गुलाम नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
केंद्र विरूद्ध राज्य वाद पेटला –
स्टॅलिन यांच्या या विधानाने केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील तणाव पुन्हा एकदा उफाळून आला आहे. २०२६ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी या वक्तव्याने राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. DMK आणि भाजप यांच्यातील शाब्दिक चकमकींमुळे तमिळनाडूत राजकीय ध्रुवीकरण वाढण्याची शक्यता आहे. स्टॅलिन यांनी द्रविड मॉडेल आणि तमिळ अस्मितेला केंद्रस्थानी ठेवत केंद्र सरकारच्या कथित केंद्रवादी धोरणांना विरोध दर्शवला आहे.





