WCL 2025 : भारताने पाकिस्तानविरुद्ध सेमीफायनल खेळण्यास दिला नकार, दहशतवादाविरोधात ठाम भूमिका!

India Refuses to Play Pakistan in WCL Semifinal 2025 : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने डब्ल्यूसीएलच्या सेमीफायनलमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास स्पष्ट नकार दिला आहे. शिखर धवन, इरफान पठान, हरभजन सिंग, युवराज सिंग आणि सुरेश रैना यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय संघाने दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची इच्छा नसल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते.
भारताने स्पर्धेच्या पहिल्या गट साखळी सामन्यातही असाच पवित्रा घेतला होता. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर त्या सामन्यात भारताच्या अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. भारताला गुरुवारी एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर पाकिस्तानविरुद्ध सेमीफायनल सामना खेळायचा होता. मात्र, भारताने दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालू शकत नाही, या देशाच्या ठाम भूमिकेचा हवाला देत सामना न खेळण्याचा निर्णय घेतला.
स्पर्धेच्या प्रायोजकाने भारताचे केले समर्थन –
स्पर्धेच प्रमुख प्रायोजक ‘ईझमायट्रिप’नेही भारत-पाकिस्तान सामन्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कंपनीचे सहसंस्थापक निशांत पिट्टी यांनी आपल्या ‘एक्स’ हँडलवर लिहिले, “आम्ही विश्व चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समधील इंडिया चॅम्पियन्सच्या शानदार कामगिरीचे कौतुक करतो. तुम्ही देशाचा गौरव वाढवला आहे. पण पाकिस्तानविरुद्धचा आगामी सेमीफायनल सामना हा सामान्य सामना नाही. दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालू शकत नाहीत.”
हेही वाचा – IND vs ENG : ‘खेळायचे होते पण ते रिस्क नव्हती घ्यायची…’, बेन स्टोक्सने सांगितले अचानक माघार घेण्याचे कारण
ईझमायट्रिप भारतासोबत ठामपणे उभे –
ते पुढे म्हणाले, “ईझमायट्रिप भारतासोबत ठामपणे उभे आहे. आम्ही अशा कोणत्याही स्पर्धेचे समर्थन करू शकत नाही, जे दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशाशी संबंध सामान्य करण्याचा प्रयत्न करते. भारतीय जनतेचा आवाज आम्ही ऐकला आहे. त्यामुळे ईझमायट्रिप विश्व चॅम्पियनशिपमधील भारत-पाकिस्तान सामन्याशी जोडलेले नाही.”
हेही वाचा – IND vs ENG : शुबमन गिलचा पिच वादावर मोठा खुलासा: क्युरेटरवर केले गंभीर आरोप, पाहा VIDEO
पिट्टी यांनी ठामपणे सांगितले, “काही गोष्टी खेळापेक्षा मोठ्या असतात. देश सर्वप्रथम, व्यवसाय नंतर.”भारताच्या चॅम्पियन्स संघाने मंगळवारी ग्रुप स्टेजमधील आपल्या शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडीज चॅम्पियन्सला अवघ्या 13.2 षटकांत पराभूत करत सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला होता.





