Wathar Station: टोल वाचवण्यासाठी महामार्गाचा खेळखंडोबा! ‘या’ मार्गावरील बेकायदा वाहतुकीमुळे अपघातांचे सावट
Wathar Station: वाठार स्टेशन फाटा ते लोणंद महामार्गावर टोल वाचवण्यासाठी अवजड वाहनांची घुसखोरी; अपघातांच्या वाढत्या धोक्यामुळे नागरिक भयभीत.

Wathar Station – वाठार स्टेशन फाटा ते लोणंद या महामार्गावर अवैधपणे सुरू असलेल्या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे अपघातांचा धोका वाढला असून संबंधित वाहनांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वराज्य क्रांती संघटनेने प्रादेशिक परिवहन विभागाला दिला आहे. स्वराज्य क्रांती संघटनेचे जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश राजाराम साबळे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांना निवेदन देत वाठार फाटा ते लोणंद मार्गावर नियमबाह्य पद्धतीने जड वाहने आणि खनिज वाहतूक करणाऱ्या गाड्यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले.
निवेदनात म्हटले आहे की, टोल नाक्यावरील कर वाचविण्यासाठी अनेक जड मालवाहू वाहने या मार्गाचा वापर करीत आहेत. यातील अनेक वाहने क्षमतेपेक्षा जास्त माल भरुन धावत असून त्यामुळे रस्त्यांवर अपघातांचा धोका वाढला आहे. सातारा- लोणंद महामार्गावरील काम सुरू असल्याने या मार्गावर आधीच वाहतुकीचा ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत अवजड वाहनांची वाढती वर्दळ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
तसेच काही एजंटांच्या माध्यमातून या वाहनांना अभय दिले जात असल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. वारंवार तक्रारी, निवेदने आणि विनंती अर्ज करूनही आरटीओ प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. संघटनेने संबंधित वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भविष्यात या जड वाहनांमुळे गंभीर अपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. याबाबत तातडीने पावले उचलली नाहीत तर स्वराज्य क्रांती संघटनेच्यावतीने आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल, असा इशारा साबळे यांनी दिला आहे.





