Accident News : महाराष्ट्रात शनिवारी (दि. ६ डिसेंबर २०२५) विविध अपघातांत १३ जणांचा मृत्यू झाला, तर ३० हून अधिक जण जखमी झाले. परभणी, गोंदिया, लातूर, जळगाव, रायगड आणि लोणावळा येथे या दुर्दैवी घटना घडल्या. मृतांमध्ये महिलांचाही समावेश आहे. परभणीत ३ ठार, २ गंभीर जखमी परभणी-वसमत महामार्गावर रहाटी जवळ स्विफ्ट डिझायर व क्रेटा कारची समोरासमोर भीषण टक्कर झाली. यात बाबाराव दत्तराव साखरे, विमलबाई बालासाहेब जाधव व कांताबाई अंबादास कातोरे या तिघांचा जागीच मृत्यू झाला. साईनाथ रामचंद्र काकडे व हरी बालासाहेब जाधव गंभीर जखमी आहेत. क्रेटा चालकावर ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. गोंदियात ट्रॅव्हल्सची उभ्या ट्रकला धडक, ३ ठार, ११ जखमी देवरी राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री १.३० वाजता भरधाव ट्रॅव्हल्सने उभ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला, तर ११ जण जखमी झाले. त्यातील ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. अहमदपूरमध्ये कार ट्रकवर धडकली, २ तरुण ठार रत्नागिरी-नागपूर महामार्गावर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकला धडक बसली. अहमदपूरचे रवीकुमार दराडे (२०) व सागर ससाणे हे दोन्ही तरुण जागीच ठार झाले. जळगाव भाविकांचा अयोध्येनजिक अपघात; महिला ठार, २५-३० जखमी अयोध्या दर्शनासाठी गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील ३५ भाविकांच्या वाहनाचा उत्तर प्रदेशातील सुलतानपूरजवळ अपघात झाला. पिंप्राळ्याच्या छोटीबाई पाटील (वय ५५) यांचा मृत्यू झाला. २५ ते ३० जण जखमी असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रायगडमध्ये दोन दुचाकींची टक्कर, २ ठार कोलाड हद्दीत वरवटे पाले-सांभेस्टॉप दरम्यान दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. दिनेश भिकू पवार व जाबेर इब्राहिम शाह हे दोघे ठार, तर २ जण किरकोळ जखमी. लोणावळ्यात लायन्स पॉइंटजवळ कार-टेम्पो अपघात, २ पर्यटक ठार लायन्स पॉइंटजवळ कार व टेम्पोची समोरासमोर टक्कर झाली. दोन्ही मृतदेहांची ओळख अद्याप पटली नाही; ते पर्यटक असल्याचा प्राथमिक अंदाज. या अपघातांमुळे राज्यात एकाच दिवशी मोठी जीवितहानी झाली असून, भरधाव वेग व निष्काळजी कारवायांमुळे अपघात वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.