Pune District : आमदारांच्या नव्हे शेतकऱ्यांच्या हस्ते जलपूजन

कोरेगाव भीमा : शिरूर तालुक्यातील चिंचणी येथील घोड धरणाच्या स्वयंचलित एका दरवाजातून नदीपात्रात रब्बी हंगामातील पहिले आवर्तन ८० क्युसेकने पाण्याचा विसर्ग बुधवार (दि. २५) पासून सोडले असून उजव्या कालव्याला आवर्तन सुटले आहे.
विशेष म्हणजे आमदारांकडून जलपूजनाची प्रथा मोडीत काढीत यावेळी शेतकऱ्यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. आमदारांच्या या भूमिकेबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. कालवा समितीची बैठक अद्याप झालेली नसली तरी पिकांना पाण्याची गरज आणि शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आवर्तन सोडावे, याकरिता पाटबंधारे खात्याकडे पाठपुरावा केला असून त्यानुसार नियोजन केले जात असल्याचेही आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले.
चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरणातून घोड नदीच्या पात्रात पाणी सोडले असून आवर्तन सुटले आहे. घोड धरणाच्या पाण्याचा नगर आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ होतो, आवर्तनात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवर्तनाचे नियोजन करण्याची सूचना आमदार कटके यांनी केली आहे.
घोडनदीवर सांगवी (ता. श्रीगोंदा) पर्यंत पाच बंधारे बांधलेले आहेत. शिरूरमध्ये उजव्या कालव्याच्या आवर्तनावर शेतकऱ्यांना पाणी नियोजन करावे लागते. शिरूर तालुक्यांतील अनेक गावांतील हजारो एकर शेती बंधाऱ्यातील पाण्यावर अवलंबून आहे. अनेक शेतकरी सिंचन व्यवस्थेसाठी पाण्याचा उपयोग करतात. परंतु, घोडचा डावा आणि उजवा कालव्याच्या मुद्यात अनेकदा आवर्तनाचे नियोजन योग्य पद्धतीने होत नाही, ही बाब लक्षात घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याचेही आमदार कटके यांनी सांगितले.
नकाशाची पाहणी करून गळती थांबवा
यावेळी कालव्यातून होणाऱ्या पाण्याच्या गळतीच्या मुद्यावरही नकाशानुसार पाहणी करीत गळती थांबविण्याच्या उपाययोजना करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. कालव्याची गळीत झाल्यास चिंचणी, शिरसगाव काटा, पिंपळसुट्टी, इनामगाव, तांदळी, मांडवगण फराटा, वडगाव रासाई, कुरूळी आदी परिसरात पाण्याची टंचाई निर्माण होते. शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नीही गंभीर होतो. ही बाब लक्षात घेत आवर्तनाचे नियोजन केले जात असून होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत कालव्याच्या गळतीचा प्रश्न प्राधान्य क्रमाने मांडणार असल्याचे आमदार कटके यांनी सांगितले.
धरणातील उपलब्ध साठ्यानुसार आवर्तनाचे नियोजन केले जात आहे. आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार नियोजन केले आहे. शेतकऱ्यांकडून होणाऱ्या मागणीला प्राधान्य देत आवर्तनाचे नियोजन केले जाईल. कालवा समितीच्या बैठकीत पुढील नियोजन ठरेल.
-महेशकुमार कृष्णा शिंदे, सहायक अभियंता-श्रेणी १





