Water Wastage: पाणी कपातीच्या काळातही अपव्यय सुरूच! पाहा पिंपरी-चिंचवडमधील हे धक्कादायक वास्तव
Water Wastage: रस्त्यांवर पाणी मारल्याने चिखल, डास आणि अपघातांचा धोका; एका बाजूला तीव्र टंचाई असताना दुसरीकडे बेफिक्रीचा कळस.

Water Wastage – यंदा पाऊस कमी पडणार असल्याचे भाकित एपि्रल महिन्यातच करण्यात आले होते. जून महिना संपत आला असून अद्याप पावसाने जोर धरला नाही. यामुळे यंदा पाणी टंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. अशा काळात पाण्याची बचत हाच सर्वांत मोठा उपाय आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्न्ांनंतरही शंभर टक्के पाणी गळती रोखण्यात यश आलेले नाही. तर दुसरीकडे नागरिकही पाण्याचा अपव्यय करण्यात मागे पढे पाहत नाहीत.
यामुळे भविष्यात पाणी टंचाईची समस्या अधिकच तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात एकीकडे पाणी कपातीचे संकट कायम असताना दुसरीकडे अनेक ठिकाणी पाण्याचा सर्रास अपव्यय होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः जुनी-नवी वाहने खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक, सायकल व वाहन विक्रेते तसेच काही वाहन धुलाई केंद्रांकडून दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जात आहे.
तर दिवसाआड होत असलेल्या पाणी पुरवठ्यातही अनेक सोसायट्यांमध्ये आणि घरांमध्ये टाक्या ओव्हरफ्लो होताना दिसून येत आहे. शहरातील विविध भागांमध्ये सकाळच्या वेळेत वाहन विक्री केंद्रांबाहेर अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने धुतली जात असल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी वाहन धुतल्यानंतर उरलेले पाणी थेट रस्त्यावर सोडले जाते किंवा रस्ते स्वच्छ करण्याच्या नावाखाली पाणी टाकले जाते.
यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. विशेषतः बैठ्या घरांच्या परिसरात रस्त्यांवर पाणी टाकल्याने चिखल, डासांची वाढ आणि घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. एकीकडे रहिवाशांना मर्यादित वेळेसाठी पाणीपुरवठा होत असताना व्यावसायिक वापरासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी खर्च होत असल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
यासोबतच शहरातील अनेक वाहन धुलाई केंद्रांमध्ये वापरले जाणारे पाणी नेमके कुठून येते, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. या केंद्रांमध्ये महापालिकेचे पिण्याचे पाणी वापरले जाते की बोअरवेलचे पाणी, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी पुनर्वापर (रिसायकल) प्रणाली नसल्याने ताजे पाणीच मोठ्या प्रमाणात वापरले जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






