पुणे : जल जीवन मिशन योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत राज्याचा सहभाग अधिक दिसावा यासाठी योजनेची कामे मिशन मोडवर करून ही योजना संपूर्ण सोलारायझेशनवर आणावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. जल जीवन मिशन योजेनेच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही सूचना दिली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जलजीवन मिशन योजनेतून घेण्यात येणाऱ्या योजनांचे सोलारायजेशन झाल्यास वीज बरोबरच वीज बिलात बचत होईल. यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन एक सर्वसमावेशक आराखडा तयार करावा. नल जल मित्र या योजनेसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेतून या तरुणांना प्रशिक्षण देण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत.