पुण्याच्या पेठांतील पाणीपुरवठा विजेअभावी विस्कळीत

पुणे – पर्वती जलकेंद्राचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पेठांमधील नागरिकांचे गेल्या काही दिवसांपासून हाल सुरू आहेत. सोमवारी सकाळीही वीज खंडित झाल्याने पेठांमध्ये उशिरा आणि कमी दाबाने पाणी आले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सकाळी दीड तास पर्वती जलकेंद्राचा वीज पुरवठा बंद असल्याने ही स्थिती उद्भवली. तर, पंपिंग स्टेशन बंद असल्याने लष्कर जलकेंद्रासही अपुरा पाणी पुरवठा झाल्याने लष्कर जलकेंद्रावरील पाणी पुरवठाही विस्कळीत झाला.
पर्वती जलकेंद्रातून सर्व पेठांसह, शिवाजीनगर आणि चतुःश्रृंगी विभागास पाणी दिले जाते. मात्र, सातत्याने या जलकेंद्राचा वीज पुरवठा खंडित होत आहे. गेल्या आठवड्यात वारंवार वीज खंडित झाल्याने टाक्यांमध्ये पाणी भरले नाही. परिणामी, अनेक भागांतील पाण्याचे वेळापत्रक कोलमडले. सकाळी वीज बंदमुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने पेठांमध्ये दुपारनंतर पाणी देण्यात आले. तर काही भागात सायंकाळी उशिरा पाणी देण्यात आल्याचे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.





