Satara: कासच्या जलवाहिनीवरील गावांचे पाणी बंद
Satara या २१ गावांतील ग्रामस्थांनी शुक्रवारी नगरपालिकेत नगराध्यक्ष अमोल मोहिते यांची भेट घेतली. घाटवण, कासानी, आटाळी, पेट्री आनावळेवाडी, पिलानी, जांभुळमोरे यवतेश्वर, सांबरवाडी, सावली, वडगाव, लुमणेखोल, सायली, दहिवड, रोहोट, आरगडवाडी, लावंघर, मस्करवाडी, कुरुज, काळोशी या गावांचा कास तलावाचा पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून ठप्प आहे.

Satara: सातारा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी कास धरण तलाव योजनेची सुधारित पाइपलाइन जोडण्याच्याकामासाठी सलग दोन दिवस बंद असलेला सातारा शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत झाला. मात्र, शहराच्या पाणीपुरवठ्याच्या कामाचा फटका आता यवतेश्वर ते कास तलाव मार्गावरील सुमारे २१ गावांनाही बसला. या गावांचा पाणीपुरवठाही ठप्प झाल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.
या २१ गावांतील ग्रामस्थांनी शुक्रवारी नगरपालिकेत नगराध्यक्ष अमोल मोहिते यांची भेट घेतली. घाटवण, कासानी, आटाळी, पेट्री आनावळेवाडी, पिलानी, जांभुळमोरे यवतेश्वर, सांबरवाडी, सावली, वडगाव, लुमणेखोल, सायली, दहिवड, रोहोट, आरगडवाडी, लावंघर, मस्करवाडी, कुरुज, काळोशी या गावांचा कास तलावाचा पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून ठप्प आहे. पाइपलाइन जोडताना या गावांसाठी असणारे टॅप जोडले न गेल्यामुळे गावांना पाणीपरुवठा होत नाही. दिवाळीच्या सणात पाण्याविना राहण्याची वेळ आमच्यावर आणू नका. शहराच्या पाइपलाइनचे काम तातडीने पूर्ण करुन कास मार्गावरील गावांचा पाणीपुरवठा त्वरित पूर्ववत करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या दालनात पाणीपुरवठा अभियंता शहाजी वाठारे, आरोग्य सभापती धनंजय जांभळे आणि ग्रामस्थांमध्ये चर्चा झाली. पाइपलाइन जोडणीचे काम तातडीने पूर्ण करण्याबरोबरच पाणीपुरवठ्याच्या टॅपची तांत्रिक प्रणाली दुरुस्त करून संबंधित गावांना लवकरात लवकर पाणी उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन नगराध्यक्ष आणि अधिकाऱ्यांनी दिले.
गावांचा पाणीपुरवठा सुरु करा… शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना त्याच जलवाहिनीवर अवलंबून असलेल्या गावांच्या पाण्याचा विचार होणे अपेक्षित आहे. शहरासाठी दोन दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेताना ग्रामीण भागातील नागरिकांना पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था का करण्यात आली नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे. दिवाळीच्या तोंडावर काम पूर्ण करण्याची निश्चित मुदत आणि प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरु होण्याची वेळ प्रशासनाने स्पष्ट करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.





