Pune District : वाघोलीकरांसाठी 50 टाक्यांमधून पाण्याची साठवणूक; पुणे महानगरपालिकेचा उपक्रम

वाघोली : पुणे महानगरपालिके च्या माध्यमातून शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी वाघोलीचे माजी उपसरपंच शांताराम कटके यांच्या पाठपुराव्याला यश आले असून वाघोली मध्ये दोन हजार लिटर क्षमतेच्या एकूण 30 पिण्याच्या पाण्याच्या टाक्या विविध ठिकाणी बसवण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
वाघोलीमध्ये यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून 20 पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या होत्या त्याबाबत नागरिक समाधानी झाले होते. याबाबत माजी उपसरपंच शांताराम कटके यांनी सांगितले की भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तात्काळ दिलासा देण्यासाठी मनपाकडून हे काम मार्गी लावले असून वाघोलीतील पाणीटंचाईवर मात करण्यास त्यामुळे मदत होईल.
वाघोलीमध्ये पुणे महानगरपालिकेच्या वतीने जवळपास 50 टाक्यांच्या माध्यमातून पाण्याची साठवणूक करून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्पुरता मार्गी लावल्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. वाघोली मधील राजेश्वरी सोसायटी, न्याती इलान, मॉर्निंग मिस्ट, स्काय वॉटर, ग्रीन रिपब्लिक, सुयोग निसर्ग, गुरुदत्त पार्क, धवल शिवतीर्थ, मयुरी आनंद, विठ्ठलवाडी आदी ठिकाणी या टाक्या बसवण्यात आल्या आहेत.
वाघोलीमधील पिण्याच्या पाण्याची योजना लवकरच कार्यान्वित होण्यासाठी आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार अशोक पवार आदींच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा सुरू असून लवकरच योजना देखील कार्यान्वित होणार असल्याने वाघोलीकरांचा कायमचा पाणी प्रश्न मिटणार आहे.
-शिवदास उबाळे, माजी सरपंच वाघोली





