Pune District : आंबेगाव-शिरूरच्या पश्चिम भागातील गावांमध्ये पाणी टंचाई

लाखणगाव : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील तसेच शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील गावांमध्ये शेती पिकांसाठी पाण्याची टंचाई निर्माण झाली असून या गावातील शेती पिकांसाठी हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये तसेच शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांमध्ये हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत असतो. सध्या या ठिकाणी मागील अनेक दिवस या कालव्याला पाणी सोडलेले नाही. त्यामुळे कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती पिके सध्या पाण्यावाचून सुकू लागली आहेत.
या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी असल्याने येथील विहिरींची पाणी पातळी घटली आहे. तसेच ओढे, नाले व तळी आटल्याने या ठिकाणच्या परिसरात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे डिंभे धरण उजव्या कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळूंज यांनी केली आहे. या परिसरात सध्या कांदा लागवड सुरू झाली असून पाण्याच्या टंचाईमुळे कांदा लागवड करण्यास अडचण येत आहे.
भाजीपिकांना पाण्याची कमतरता
त्याचप्रमाणे जनावरांचा चारा, तरकारी पिके यांना ही पाण्याची कमतरता जाणवत आहे. साखर कारखाने सुरू झाल्याने या परिसरात असणाऱ्या उसाच्या तोडणी सुरू झाली आहे. परंतु या ऊसालाही पाणी नसल्याने वजनामध्ये घट होत आहे. डिंभा धरण उजव्या कालव्याला पाणी सोडावे. कालव्याच्या माध्यमातून हजारो एकर शेती बागायती झाली आहे. परंतु पाण्यामुळे शेती पिके सुकू लागल्याने उजव्या कालव्याला पाणी सोडावे. अशी मागणी जोर धरत आहे.





