पुणे जिल्हा | वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीटंचाईची झळ

थेऊर, (वार्ताहर)- दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पूर्व हवेलीतील काही गावांमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला होता. काही ठिकाणी झाडे कोसळल्याने तर काही भागात झाडांच्या फांद्या विद्युत तारांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. त्यामुळे हवेलीतील पूर्व भागातील नागरिकांचे हाल झाले आहेत.
आळंदी म्हातोबाची, कुंजीरवाडी, कोलवडी, वळती, तरडे, हिंगणगाव, भिवरी, कदमवाकवस्ती व लोणी काळभोर तसेच उरुळी कांचनच्या काही परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
कडक उन्हाच्या झळा काही प्रमाणात कमी झाल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. परिणामी, वीजपुरवठा बंद असल्याने पूर्व हवेलीतील काही गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने नागरिकांचे हाल होत आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी शुद्ध पेयजलाच्या स्थळावर रांगा लागत आहेत. तरी नागरिकांसह शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.
गेल्या महिन्यापासून पाणीटंचाईमुळे आठवड्यातून एक किंवा दोन वेळाच नळाद्वारे पाणी सोडले जाते. असे असताना वारा आणि पावसामुळे विद्युत पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे या काळात वीजपुरवठा खंडित झाल्याने विद्युत मोटारी बंद होत्या. परिणामी शेतातील पिकांना पाणी पुरवठा करणा-या यंत्रणा तसेच शुद्ध पेयजल घटकाच्या योजनाही लाईट अभावी विस्कळीत झालेल्या आहेत.





