उन्हाच्या तडाख्याने राजगडावर पाणीटंचाई: पर्यटक घटले, माकडांसाठी कर्मचारी सरसावले

वेल्हे (विलास बांदल) – राज्यभरात उन्हाचा कहर वाढला असून, तापमान 40 अंशांपार गेलं आहे. आजारपणं वाढली असून, अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवत आहे. राजगड तालुक्यातही उष्णता वाढली असून, छोटे-मोठे आजार डोकं वर काढत आहेत. तालुक्यात भीषण पाणीटंचाई नसली तरी किल्ल्यांवर पाणी कमी पडत आहे. यामुळे पर्यटकांची संख्या 70 टक्क्यांनी घटली असून, स्थानिक व्यावसायिकांचं नुकसान झालं आहे.
जंगलात पाणीटंचाईमुळे प्राणी गावाकडे येत आहेत. राजगड आणि तोरणा किल्ल्यांवर पाणी आणि अन्नाचा तुटवडा जाणवत असून, माकडांना त्याचा फटका बसला आहे. पर्यटक कमी झाल्याने पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी बापू साबळे स्वखर्चाने माकडांसाठी खाद्य टाकत आहेत.
राजगडावर तीन माच्या आणि बालेकिल्ल्यासह अनेक पाण्याची टाकी आहेत. पद्मावती माचीवरील तलाव मोठा असला तरी त्याचं पाणी पिण्यासाठी वापरलं जात नाही. इतर टाक्यांमधील पाणी आटत चाललं आहे, ज्यामुळे पर्यटक कमी झाले आहेत. स्थानिकांचं म्हणणं आहे की, पद्मावती तलाव आणि सदरेमागील तलावाचं पाणी शुद्धीकरण प्रकल्पाने वापरलं तर पर्यटकांना सोय होईल.
“राजगडावरील माकडांशी माझं नातं जुळलं आहे. पर्यटक खाद्य टाकतात, पण आता ते कमी झाले. उन्हाळ्यात जंगलात अन्न मिळणं कठीण झालं आहे. कैऱ्यांचं उत्पन्नही कमी आहे आणि प्राण्यांची संख्या वाढली आहे. म्हणून मी रोज स्वखर्चाने खाद्य टाकतो. माकडं माझ्याकडे धावत येतात, त्याचं समाधान वाटतं.”
– बापू साबळे, कर्मचारी, पुरातत्त्व विभाग, पुणे
“सौरऊर्जेचा वापर करून पद्मावती तलाव, सदरेमागील तलाव आणि चंद्रकोर टाक्यावर शुद्धीकरण प्रकल्प झाला तर पाणीटंचाई टळेल. छोटी-मोठी टाकी स्वच्छ करून पावसाचं पाणी साठवलं तर वर्षभर पुरेल. पुरातत्त्व विभागाने कमी खर्चात विकास आराखडा बनवावा.”
– ॲड. विजय थोपटे / राजू डमकले, पर्यटक, पुणे





