पुणे जिल्हा | घोड धरणातून रांजणगावला पाणीयोजना

रांजणगाव गणपती, (वार्ताहर)- रांजणगाव औद्योगिक वसाहतीमुळे व महागणपतीचे तीर्थक्षेत्र असल्यामुळे रांजणगाव गणपती येथील वाढती लोकसंख्या लक्षात शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील घोड धरणा वरून नवीन पाणी योजना सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना अजित पवार यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.
अशी माहिती शिरूर -आंबेगाव विधानसभा मतदार संघांचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रांजणगाव ग्रामपंचायत सरपंच सुवर्णा वायदंडे, उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर व ग्रामपंचायत सदस्यांनी केलेल्या मागणीनुसार सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. ही बैठक 30 जुलै रोजी मुंबई येथे मंत्रालयामध्ये झाली.
रांजणगाव रांजणगाव औद्योगिक वसाहतीमुळे व महागणपतीचे तीर्थक्षेत्र असल्यामुळे रांजणगाव येथे मोठ्या प्रमाणात नागरिकरण वाढले आहे. रांजणगावची लोकसंख्या सध्या सुमारे एक लाखाच्या घरात आहे.
त्यामुळे कोंढापुरी तळ्यावरून जी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे त्या योजनेचे पाणी उन्हाळ्यामध्ये संपून जाते. कधी कधी गैरसवायला सामोरे जावे लागते. सध्याची पाणीपुरवठा योजना सन 2011 साली सुरू करण्यात आली होती.
या योजनेसाठी सुमारे 20 कोटींची तरतूद करण्यात आली होती; मात्र या वाढत्या लोकसंख्येमुळे तसेच कोंढापुरी तळ्यावर शिक्रापूर, कोंढापुरी, गणेगाव खालसा या गावांच्या पाणीपुरवठा योजना आहेत. त्याचबरोबर या तळ्याच्या पाण्याचा वापर शेतकरी शेतीसाठी करत आहेत.
त्यामुळे रांजणगावच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता व पुढील भविष्याचा पाणीटंचाईचा विचार करून सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रांजणगाव गणपती साठी चिंचणी येथील घोड धरणावरून नवीन पाणीपुरवठा योजना करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
या मागणीची दखल घेत लवकरात लवकर सर्वे करून सदर येजना कार्यन्वित करण्याच्या सूचना अजित पवार यांनी अधिकार्यांना दिल्या असून सदर योजनेसाठी सुमारे 50 ते 60 कोटी खर्च होणार असल्याचे मानसिंग पाचुंदकर यांनी सांगितले.
या बैठकीस सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील (दूरदृश्य प्रणालीद्वारे), उद्योग मंत्री उदय सामंत, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले,
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील (दूरदृश्य प्रणालीद्वारे), अमोल जगताप, अजित कोहकडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल दंडे, नेताजी फंड, अशोक शेळके, निलेश लांडे, हर्षल गदादे, दीपक खैरे, संदीप गवारे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सांडपाण्यावर प्रक्रिया करावी
नैसर्गिक दृष्ट्या रांजणगावचे 90 टक्के सांडपाणी हे एकाच बाजूला वाहत असल्याने या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया राबवण्यासाठी जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सर्वे करण्याचे आदेश या बैठकीमध्ये देण्यात आले आहेत.
सर्वे करून या सांडपाण्यावरती प्रक्रिया करून हे पाणी पुढे ओढ्यांमध्ये सोडून शेतीसाठी वापरले जाऊ शकते या कामासाठी ही जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी आश्वासने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.





