पुण्यतील बोगद्यासाठी मातीपरीक्षण वेगात ! खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान पाणी योजना; दोन महिन्यांत आराखडा

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 4 -खडकवासला धरण ते फुरसुंगी असा 25 किलोमीटर लांबीचा बोगदा खोदण्यासाठी माती परीक्षणाचे काम वेगाने सुरू आहे. बोगदा ज्या भागातून जाणार आहे, त्या मार्गावरील पन्नास टक्के माती परीक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण करून बोगद्याचा आराखडा आणि प्रकल्पासाठी अपेक्षित असलेला खर्च निश्चित केला जाणार आहे.
खडकवासला धरणातून कालव्यात सोडले जाणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन, गळती, चोरी आदींमुळे सुमारे अडीच टीएमसी पाणी वाया जाते. शिवाय कालव्यात पडणारा कचरा यामुळे पाणी प्रदूषित होते. या पार्श्वभूमीवर खडकवासला धरण ते फुरसुंगी या 25 किलोमीटर लांबीच्या बोगद्यामधून पाणी नेण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र त्यासाठी निधी कसा उभारावा, याबाबतचा प्रश्न होता. त्यामुळे ही योजना गेली अनेक वर्षे रखडली होती.
मध्यंतरी पुन्हा या योजनेला चालना देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारकडून घेण्यात आला. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार निविदा मागवून एका खासगी कंपनीला हे काम देण्यात आले. संबंधित कंपनीने दोन महिन्यांत सर्वेक्षण पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल यापूर्वीच सादर केला आहे. त्यास मान्यता देण्यात आल्यानंतर या प्रकल्पासाठीचा सर्वंकष अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
प्रत्येक अर्ध्या किलोमीटरवर बोअर
ज्या मार्गाने बोगदा जाणार आहे, त्या मार्गावरील जमिनींची तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक अर्धा किलोमीटर अंतरावर बोअर खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत जवळपास पन्नास टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील दोन महिन्यांत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.




