Water Scarcity : माजगाव परिसरातील गुरांचे हाल! ८ वर्षांपासून कालवा बंद; ४ गावांतील दुग्धव्यवसाय धोक्यात?
Water Scarcity : माजगाव, पौध, आंबिवली आणि वारद गावांसाठी महत्त्वाचा असलेला खरसुंडी कालवा गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे.

Water Scarcity – माजगाव परिसरात गेल्या सात ते आठ वर्षांपासून कालवा बंद असल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याअभावी गुरांना डबक्यातील किंवा रस्त्यावर साचलेल्या पाण्यावरच समाधान मानावे लागत असल्याचे विदारक चित्र सध्या पाहायला मिळत आहे. माजगावसह पौध, आंबिवली आणि वारद या गावांसाठी खरसुंडी येथील बंधाऱ्यातून कालव्याद्वारे पाणीपुरवठा होत होता.
या पाण्यामुळे परिसरात हिरवळ टिकून राहत होती. शेतीसाठी तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हा कालवा महत्त्वाचा स्रोत होता. मात्र कालव्याची वेळोवेळी दुरुस्ती न झाल्याने तो जीर्ण अवस्थेत गेला आणि अखेर बंद पडला. गेल्या अनेक वर्षांपासून हा कालवा कोरडाच पडून असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
ग्रामीण भागात शेतीसोबतच दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांचा प्रमुख आधार आहे. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह हा जनावरांवर अवलंबून असतो. मात्र पाण्याअभावी गुरांचे संगोपन करणे दिवसेंदिवस कठीण बनत आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे विहिरी, ओढे आणि इतर पाणीस्रोत आटत चालले आहेत. परिणामी गुरांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कालवा दुरुस्त करून पुन्हा सुरू केल्यास या भागातील पाणीटंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.





